सेबी ॲक्शन मोडमध्ये! पेटीएमच्या विजय शेखर शर्मांना पाठवली नोटीस, वाचा... काय आहे संपुर्ण प्रकरण
देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेटीएमचा आयपीओबद्दलचे तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडल्याच्या आरोपावरून शर्मा यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. शर्मा यांच्यासोबतच आयपीओच्या वेळी कंपनीच्या संचालक मंडळावर असलेल्यांनाही ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, आता याबाबतची माहिती समोर येताच, शेअर बाजारात कंपनीचा शेअर पत्त्यासारखा कोसळला आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये आला होता आयपीओ
पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचा आयपीओ नोव्हेंबर 2021 मध्ये आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांना सेबीची नोटीस मिळाल्याची बातमी समोर आलयानंतर पेटीएमचे शेअर्स नऊ टक्क्यांनी घसरून, 505.55 रुपयांपर्यंत खाली आले. मात्र, त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये सुधारणा होऊन, 4.25 टक्क्यांच्या घसरणीसह 530.95 रुपयांवर बंद झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) संशय आहे की विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमचा आयपीओ लॉन्च करताना काही तथ्ये चुकीची मांडली आहेत. सोप्या शब्दात सांगायचे तर, विजय शेखर शर्मा यांना आयपीओ दरम्यान कंपनीचे प्रवर्तक मानले जावेत की नाही हे संपूर्ण प्रकरण आहे. जर त्यांना प्रवर्तक मानले गेले तर त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आयपीओचा फायदा घेतल्याचा आरोप होईल. असे सेबीने आपल्या नोटीशीत म्हटले आहे. दरम्यान, पेटीएमच्या आयपीओनंतर तब्बल तीन वर्षांनी सेबीने पेटीएमवर ही कारवाई केली आहे.
पेटीएमच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांनी घसरण
पेटीएमचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सावरत होता. मात्र, विजय शेखर शर्मा यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यात मोठी घट झाली आहे. आज शेअर बाजारात ट्रेडिंग दरम्यान पेटीएमचा शेअर जवळपास 9 टक्क्यांनी घसरला होता. त्यात काहीशी सुधारणा होऊन, तो बाजार बंद होताना, शेवटी 4.48 टक्क्यांच्या घसरणीसह 530.00 रुपयांवर बंद झाला आहे. पेटीएम शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणुकदारांना सुमारे 24 टक्के परतावा दिला आहे.