शेअर बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले, मोठं कारण आलं समोर
चीनमधून आलेल्या HMPV व्हायरसमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. कर्नाटकात दोन आणि गुजरातमध्ये एक रुग्ण आढळल्यामुले शेअर बाजारातही घबराहट निर्माण झाली आहे. आज मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. टाटा स्टीलपासून इन्फोसिसपर्यंत 30 पैकी 28 समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या 11 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे.
चिनी विषाणू व्यतिरिक्त शेअर बाजारातील घसरणीची इतर काही प्रमुख कारणेही मानली जात आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा कालावधी सुरूच आहे. सोमवारी आशियाई बाजारांमध्ये 1.40 टक्क्यांची घसरण दिसून आली. शेवटी, अर्थसंकल्प आणि फेड पॉलिसी तसेच त्रैमासिक निकालांच्या संकेतांमुळे शेअर बाजाराचा मूड सारखाच असल्याचे दिसून येते. मात्र, गेल्या दोन व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
सोमवारी शेअर बाजारात दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 1,258.12 अंकांच्या घसरणीसह 77,964.99 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स 79,281.65 अंकांवर उघडला, तर ट्रेडिंग सत्रादरम्यान 1,441.49 अंकांची घसरण दिसून आली आणि सेन्सेक्स 77,781.62 अंकांवर खाली आला. मात्र, गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स 1,978.72 अंकांनी घसरला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. सोमवारी निफ्टी 388.70 अंकांच्या घसरणीसह 23,616.05 अंकांवर बंद झाला. तथापि, व्यवहाराच्या सत्रादरम्यान, निफ्टी 452.85 अंकांनी घसरला आणि 23,551.90 अंकांच्या खालच्या पातळीवर पोहोचला. मात्र, गेल्या दोन दिवसांत निफ्टीमध्ये 572.6 अंकांची घसरण दिसून आली आहे.
या मोठ्या घसरणीदरम्यान काही शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. आकडेवारीनुसार, अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्समध्ये 1.94 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा कंझ्युमर शेअर्समध्ये 1.12 टक्के आणि टायटनच्या शेअर्समध्ये 0.72 टक्के वाढ झाली. एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये किंचित वाढ दिसून आली.
दुसरीकडे, जर आपण घसरलेल्या समभागांबद्दल बोलायंच झालं तर, NSE वर टाटा स्टीलच्या समभागांमध्ये सर्वाधिक 4.60 टक्के घसरण दिसून आली. ट्रेंटचे शेअर 4.35 टक्क्यांनी घसरून बंद झाले. BPCL आणि NTPC चे समभाग 3.60 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. तर अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 3.61 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सोमवारी 11 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी बीएसईचे मार्केट कॅप 4,49,78,130.12 कोटी रुपये होते. जे सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर 4,38,79,406.58 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दिवसभरात 10,98,723.54 कोटी रुपयांचे नुकसान झाले.