शेअर बाजार घसरणीसह बंद; रिलायन्स पॉवरच्या शेअरमधील तेजीमुळे मार्केट कॅप उच्च पातळीवर!
शेअर बाजारासाठी चालू आठवडा काहीसा उच्चांकी उसळीचा राहिला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता.२३) सकाळी 09.51 मिनिटांनी बाजाराने 85,000 अंकांचा आकडा पार केला होता. तर आता ऐतिहासिक उसळीनंतर आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात नफावसुली परतल्यामुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. प्रामुख्याने बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये नफा बुकिंगमुळे बाजारात ही घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मात्र वाढ
आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 264 अंकांनी घसरून 85,571 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37 अंकांनी घसरून 26,179 अंकांवर बंद झाला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी जरी घसरले असले तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मात्र वाढ दिसून आली आहे.
बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 477.97 लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 477.17 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 80000 कोटी रुपयांपर्यंत वाढ दिसून आली आहे.
हे देखील वाचा – ऑक्टोबरमध्ये बॅंकांना असेल तब्बल 15 दिवस सुट्टी, सणासुदीचे आतापासूनच करा नियोजन…
कोणते शेअर्स राहिले तेजीत
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 समभाग हे वाढीसह तर 15 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 29 शेअर्स हे वाढीसह बंद झाले आहेत. तर 21 समभाग तोट्यासह बंद झाले आहेत. वाढत्या समभागांमध्ये सन फार्मा 2.67 टक्के, रिलायन्स 1.72 टक्के, टायटन 1.50 टक्के, एचसीएल टेक 1.31 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.10 टक्के, एशियन पेंट्स 0.90 टक्के, एनटीपीसी 0.73 टक्के, इंडसइंड बँक 0.66 टक्के, महेंद्र 3 टक्के, महेंद्र 3 टक्के. 0.54 टक्के, मारुती 0.49 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहे.
कोणत्या शेअर्समध्ये झाली घसरण
तर पॉवर ग्रिड ३.०३ टक्के, आयसीआयसीआय बँक १.८३ टक्के, भारती एअरटेल १.७४ टक्के, एचडीएफसी बँक १.६५ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.५५ टक्के घसरणीसह बंद झाले आहेत.
आज शेअर बाजारात प्रामुख्याने ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले आहेत. बँकिंग, एफएमसीजी, मीडिया आणि रिअल इस्टेट शेअर्स बंद झाले आहेत. याशिवाय मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही प्रॉफिट बुकिंग दिसून आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)