शेअर बाजार पुन्हा कोसळला...! 693 अंकांची आपटी, गुंतवणूकदारांचे 4.45 लाख कोटींचे नुकसान!
मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत अशुभ ठरला आहे. बँकिंग, एनर्जी, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सची विक्री मंदावल्याने बाजार घसरला. केवळ ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्येच खरेदी दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 693 अंकांच्या घसरणीसह 78,956 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 208 अंकांच्या घसरणीसह 24,139 अंकांवर बंद झाला. आज दिवसभरात बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 4.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोणत्या शेअर्समध्ये उसळी
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 6 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर 24 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 14 वाढीसह आणि 36 घसरणीसह बंद झाले. आज बाजारात खरेदी झालेल्या शेअर्समध्ये हिंदुस्तान कॉपरचा समावेश आहे. जो 3.37 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय बलराम चिनी ३.२८ टक्के, अरबिंदो फार्मा ३.०१ टक्के, डिक्सन टेक्नॉलॉजी २.७६ टक्के, मॅरिको २.४७ टक्के, टीव्हीएस मोटर २.२४ टक्के, टायटन कंपनी १.८९ टक्के, अपोलो रुग्णालय १.३४ टक्के वाढीसह बंद झाले.
‘या’ शेअर्समध्ये झाली घसरण
आज शेअर बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये आरती इंडस्ट्रीज १५.४५ टक्के, चंबळ फर्टिलायझर ७.०८ टक्के, झायडस लाइफ ५.९९ टक्के, एचडीएफसी बँक ३.२८ टक्के, टाटा स्टील २.३७ टक्के, बजाज फायनान्स २.०२ टक्के, एसबीआय १.९७ टक्के, टाटा मोटर्स १९ टक्के घसरणीसह बंद झाले.
हेही वाचा : ‘ही’ भारतीय कंपनी करणार ब्रिटिश कंपनीसोबत 33,578 कोटींचा करार; शेअर्सवर दिसणार परिणाम!
गुंतवणूकदारांचे 4.45 लाख कोटींचे नुकसान
आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप घसरून, 445.37 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील सत्रात 449.82 लाख कोटी रुपये इतके होते. अर्थात आज बाजारात गुंतवणूकदारांचे तब्बल 4.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज शेअर बाजारात बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी आणि ऑइल आणि गॅस सेक्टरचे शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. केवळ ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर आणि आयटी शेअर्स वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग दिसून येत आहे.