फोटो सौजन्य - Social Media
मुंबईतील विकेश शाह यांची कहाणी एखाद्या प्रेरणादायी चित्रपटासारखी वाटते. गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अपयशाचा सामना करत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि धैर्याच्या जोरावर “99 पॅनकेक्स” नावाचा कोट्यवधींचा व्यवसाय उभारला. ही केवळ व्यावसायिक यशाची गोष्ट नसून, कठीण परिस्थितीमध्ये हार न मानता झगडणाऱ्या व्यक्तीने कसा शून्यातून शिखर गाठले, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.
विकेश शाह यांचं बालपण संघर्षमय होतं. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांना शेअर बाजारात मोठा तोटा सहन करावा लागला आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या आईवर आली. त्यामुळे विकेश यांनी दहावीपासूनच काम करण्यास सुरुवात केली. मुंबईतील चर्चगेट येथील एका बेकरीमध्ये ते केवळ 700 रुपयांमध्ये काउंटर बॉय म्हणून काम करत होते. शिक्षण सुरू ठेवत त्यांनी 18व्या वर्षी त्या बेकरीत मॅनेजरची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल कंपन्यांतून ते परफ्यूम विक्रीपर्यंत अनेक लहान-मोठी कामं केली.
1998 मध्ये त्यांची नोकरी गेली आणि महिनाभर त्यांच्याकडे वडापाव खरेदी करण्याइतकेही पैसे नव्हते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. 1999 मध्ये, केवळ 22 व्या वर्षी त्यांनी ‘बेक पॉइंट’ नावाचा पहिला B2B व्यवसाय सुरू केला. यात ते मोठ्या केटरिंग कंपन्यांना डेसर्ट्स आणि पेस्ट्री पुरवत होते. पुढे 2009 मध्ये ‘हॅप्पीनेस डेली’ नावाची स्वतःची केक शॉपही सुरू केली.
2014 मध्ये एम्स्टर्डॅम दौऱ्यात त्यांनी रस्त्याच्या कडेला बनणारे पॅनकेक पाहिले आणि ते शिकण्याचा निर्धार केला. 2016 मध्ये नोटबंदीमुळे जुना व्यवसाय थंडावला असताना, शेजारी असलेल्या युक्रेनियन व्यक्तीच्या सल्ल्याने त्यांनी पॅनकेक रिटेलमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. जून 2017 मध्ये, फक्त 9 लाखांच्या गुंतवणुकीतून काला घोडा येथे ‘99 पॅनकेक्स’चा पहिला आउटलेट सुरू केला. सुरुवातीला कमी विक्री झाली, पण जिद्द, मार्केटिंग आणि दर्जेदार उत्पादनामुळे व्यवसायाने वेग पकडला.
आज ‘99 पॅनकेक्स’ चे 5 राज्यांतील 10 शहरांमध्ये 40 आउटलेट्स आहेत, ज्यापैकी 30 फ्रँचायझी स्वरूपात आहेत. सुमारे 70 कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना काळात व्यवसायावर परिणाम झाला तरी विकेश शाह यांनी पुन्हा भरारी घेतली. आज ते आपल्या स्वप्नातल्या घरात BMW गाडी चालवतात. त्यांची कहाणी हेच सांगते, “जिथे जिद्द आहे, तिथे मार्ग आहे!”