फोटो सौजन्य - Social Media
चेन्नईतील ६९ वर्षीय विद्याधरन नारायणन हे एक शहरी शेतकरी आहेत. त्यांनी अवघ्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी ऑर्गेनिक मायक्रोग्रीन्स उगवण्याच्या युनिटची स्थापना केली आणि ३०० चौरस फूट जागेत शेती सुरू केली. आज त्यांच्या व्यवसायाचा मासिक टर्नओव्हर सुमारे १ लाख रुपयांच्या घरात आहे, ज्यातून त्यांना दरमहा ६०,००० रुपयांहून अधिक नफा मिळतो. विद्याधरन यांनी सामाजिक क्षेत्रात ३० वर्षे काम केल्यानंतर २०१४ मध्ये मायक्रोग्रीन्स शेतीला सुरुवात केली. त्यांनी अल्प गुंतवणुकीत टिकाऊ आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी मायक्रोग्रीन्सची निवड केली. मायक्रोग्रीन्स हे लहान रोपे असतात, जे फक्त ७ ते ९ दिवसांत वाढतात आणि तोडणीसाठी तयार होतात. पोषणमूल्यांनी समृद्ध आणि उत्तम चव असलेली ही रोपे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
विद्याधरन यांच्या यशस्वीतेमुळे मायक्रोग्रीन्स शेती हा कमी जागा आणि अल्प गुंतवणुकीत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे स्पष्ट होते. त्यांनी आपल्या घरातील २५ चौरस फूट जागेत सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मोहरी, मेथी आणि ब्रोकलीसारख्या लोकप्रिय प्रकारांवर प्रयोग केले आणि त्यांना स्थानिक बाजारपेठेत विकले. २०१७ पर्यंत त्यांनी आपले उत्पादन वाढवत घरातील १०० चौरस फूट जागेत शेती केली. पुढे, १ लाख रुपयांपेक्षा कमी खर्चात त्यांनी ३०० चौरस फूट ग्रीन नेट शेड उभारले, ज्यामध्ये नैसर्गिक हवेच्या प्रवाहाचा उपयोग करून योग्य वातावरण राखले जाते. त्यामुळे विजेचा खर्चही कमी होतो.
विद्याधरन आपल्या शेतीसाठी वर्मीकंपोस्टचा वापर करतात. ते मुळा, बीट, कोबी, फ्लॉवर आणि ग्रीन टीच्या चार प्रकारांसह विविध मायक्रोग्रीन्स उगवतात. ते आठवड्याला सुमारे १५ किलो (महिन्याला ६० किलो) मायक्रोग्रीन्स विकतात. त्यांची किंमत १२०० ते ३००० रुपये प्रति किलोपर्यंत असते, जी प्रकारानुसार बदलते.
त्यांचे मुख्य ग्राहक स्थानिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. मायक्रोग्रीन्सचा वापर सॅलड, सॅंडविच आणि विविध पदार्थांमध्ये केला जातो. मायक्रोग्रीन्स शेतीमुळे कमी जागेत, कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळू शकतो, हे विद्याधरन यांच्या यशाने सिद्ध केले आहे.