(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Swiggy आणि Zomato च्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या कमाई आणि भविष्याबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जाते. प्रत्येक डिलिव्हरीमागे मिळणाऱ्या पैशातून आपण किती कमवू आणि बचत करू शकतो, असा प्रश्न त्यांना पडायचा. पण आता कंपनीने यावर एक चांगला आणि उत्तम उपाय शोधला आहे. स्विगीने झिरोधासोबत भागीदारी करत उत्तम पर्याय शोधून काढला आहे. ज्यामुळे डिलिव्हरी पार्टनर्सना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. नेमका काय आहे हा पर्याय सविस्तर जाणून घेऊयात.
स्विगीने मंगळवारी जाहीर केलं की, त्यांनी झिरोधा फंड हाऊससोबत भागीदारी केली आहे. ज्याच्या मदतीने त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सना ॲपद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येईल. डिलिव्हरी पार्टनर्स आपल्या कमाईतील काही भागाची गुंतवणूक फक्त ₹100 पासून सुरू करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम थेट झिरोधा फंड हाऊसच्या योजनांमध्ये गुंतवली जाईल. डिलिव्हरी पार्टनर्स व्हॉट्सॲपद्वारे त्यांच्या गुंतवणुकीची आणि पोर्टफोलिओची माहिती सहजपणे पाहू आणि व्यवस्थापित करू शकतील.
या भागीदारीनंतर, स्विगीचे उपाध्यक्ष सौरभ गोयल म्हणाले, “या उपक्रमाचा उद्देश डिलिव्हरी पार्टनर्सना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना भविष्यासाठी बचत करण्याचे सोपे साधन उपलब्ध करून देणे हा आहे.”
झीरोधा फंड हाऊसचे सीईओ विशाल जैन म्हणाले, “गिग वर्कर्सचे उत्पन्न नियमित नसते, त्यामुळे त्यांना दीर्घकाळासाठी बचत करणे कठीण जाते. आता, स्विगी डिलिव्हरी पार्टनर्स त्यांच्या साप्ताहिक कमाईचा काही भाग फक्त काही क्लिक्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतील आणि गरजेनुसार पैसे काढू शकतील.”
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, स्विगी आधीपासूनच आपल्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी विम्यासारखे अनेक फायदे देते. हा नवीन उपक्रम अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतात ‘गिग इकॉनॉमी’ झपाट्याने वाढत आहे, परंतु अनियमित उत्पन्नामुळे लाखो कामगारांसाठी बचत करणे हे एक आव्हानच राहिले आहे. या सुविधेमुळे त्यांना अगदी लहान रक्कम गुंतवून भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळणार आहे.
Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव 70 रुपयांच्या पार, भाव कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय?






