2000 रुपयांच्या नोटा छपाईला किती खर्च आला होता? खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली संसदेत माहिती!
8 नोव्हेंबर 2016 ही भारतात नोटाबंदीची सर्वात मोठी घोषणा झाली होती. अर्थात त्यानंतर देशात २००० आणि ५०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या होत्या. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी अचानक 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. 2000 च्या नोटा चलनात येऊन सात वर्षेही उलटली नाहीत. की त्या चलनात काढून घेण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर आज (ता.२) राज्यसभेत 2000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी आणि नष्ट करण्याच्या खर्चाबाबत सरकारला प्रश्न विचारण्यात आला.
12,877 कोटी रुपये झाले खर्च
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबाबत उत्तर देताना सांगितले की, जुलै 2016 ते जून 2017 आणि जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत सर्व मूल्यांच्या नोटांच्या छपाईसाठी 12,877 कोटी रुपये खर्च आला. मात्र, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या प्रक्रियेवर एकूण किती खर्च झाला याबाबत स्वतंत्रपणे गणना केलेली नाही.
राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला अर्थमंत्र्यांचे उत्तर
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, त्यात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्यसभा खासदार संदीप कुमार पाठक यांनी अर्थमंत्र्यांना २००० रुपयांच्या नोटांची छपाई आणि त्या नष्ट करण्याबाबत आलेल्या खर्चासंदर्भात प्रश्न विचारला. केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या किती नोटा छापल्या आणि या छापण्यासाठी आणि त्या चलनातून काढून घेण्यासाठी किती खर्च आला? याबाबत माहिती द्यावी. असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
या प्रश्नावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीसंसदेत माहिती देताना सांगितले आहे की, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, नोटबंदीनंतर सर्व मूल्यांच्या नोटांच्या छपाईचा खर्च अनुक्रमे 7965 कोटी आणि 4912 कोटी रुपये इतका आला होता. म्हणजेच नोटाबंदीच्या चार महिने आधी आणि त्यानंतर २० महिने नोटांच्या छपाईवर १२८७७ कोटी रुपये खर्च झाले.”
दरम्यान, अर्थमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले आहे की, 19 मे 2023 रोजी जेव्हा 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या, त्यापैकी 3.48 लाख कोटी रुपयांच्या नोटा 30 जूनपर्यंत बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत.