फोटो सौजन्य - Social Media
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी केवळ चांगली कल्पना असून भागत नाही, तर वेळेची गरज ओळखून योग्य त्या वेळी धाडसी निर्णय घेणे आणि सातत्याने प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सनत जैन आणि विशाल जैन या दिल्लीच्या व्यावसायिक मेव्हणा-दाजीच्या जोडीने हे सिद्ध करून दाखवले आहे. सीसीटीव्ही व्यवसायातील अडचणींवर मात करत त्यांनी ‘लवना स्मार्ट डोर लॉक्स’ नावाने एक नावीन्यपूर्ण स्टार्टअप सुरू केले आणि अवघ्या तीन वर्षांत ७ कोटी रुपयांचा टर्नओव्हर गाठला. सनत आणि विशाल दोघेही दिल्लीतील चांदणी चौक भागात एकत्रितपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीचा व्यवसाय करत होते. या क्षेत्रात वाढती स्पर्धा, कमी मार्जिन आणि दररोज नवे तंत्रज्ञान यामुळे 2020 पर्यंत त्यांचा व्यवसाय टिकवणे कठीण झाले. अखेरीस त्यांनी तो व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांच्याही मनात काहीतरी वेगळं, नविन करण्याची खुमखुमी होती.
2020 मध्ये चीन दौऱ्यावर असताना त्यांनी तिथल्या डिजिटल स्मार्ट डोर लॉक टेक्नॉलॉजी पाहिली. त्यांनी हे लॉक स्वतःच्या घरी लावून वापरून पाहिले आणि त्याचा अनुभव अत्यंत सकारात्मक ठरला. भारतासारख्या देशात अजूनही पारंपरिक किल्ल्या आणि चाव्यांवर अवलंबून असलेली सुरक्षितता आणि रोजची गैरसोय त्यांना खटकली. त्यातूनच त्यांना वाटलं की भारतात स्मार्ट लॉक ही संकल्पना यशस्वी ठरू शकते.
सनत आणि विशाल यांनी सुरुवातीला विविध ब्रँडसाठी OEM (Original Equipment Manufacturer) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना स्मार्ट लॉक मार्केटचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. ग्राहकांची गरज, तांत्रिक वैशिष्ट्ये, किंमतीचे गणित आणि स्पर्धात्मक बाजारातील धोरण हे सर्व शिकण्याची ही फेज ठरली.
जानेवारी 2021 मध्ये त्यांनी स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘लवना स्मार्ट डोर लॉक्स’ हे नाव घेत त्यांच्या कंपनीची ‘भगवान श्री लॉक्स प्रायव्हेट लिमिटेड’ स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी ५०-५० लाख रुपयांची गुंतवणूक केली. विशाल जैन यांनी खरेदी, उत्पादन आणि सेवा या विभागांची जबाबदारी घेतली, तर सनत जैन यांनी विक्री आणि मार्केटिंग यावर लक्ष केंद्रित केलं.
बाजारात यावेळी गोदरेज, येल आणि इतर मोठे चायनीज ब्रँड्स आधीच सक्रिय होते. त्यामुळे नवख्या ‘लवना’ ब्रँडसमोर एक मोठं आव्हान होतं. ग्राहकांचा विश्वास मिळवणे. कमी किंमतीत मिळणाऱ्या चायनीज उत्पादनांमुळे बाजारात टिकून राहणं कठीण वाटत होतं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी उत्पादनांची गुणवत्ता, फिचर्स आणि ग्राहक सेवेवर विशेष भर दिला. लवना स्मार्ट लॉक्समध्ये अनेक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. Wi-Fi आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फिंगरप्रिंट ओळख (०.४ सेकंदात), OTP आधारित प्रवेश, वेळेनुसार लॉक नियंत्रण, मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटी अशा सुविधांमुळे लवना इतरांपेक्षा वेगळा ठरतो. हे सर्व फीचर्स भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार डिझाइन केले गेले आहेत.