देशात कोण भरते सर्वाधिक टॅक्स, अंबानी की अदानी? धोनी पहिल्या तर अक्षय कुमार दुसऱ्या क्रमांकावर
देशात अनेक प्रकारचे कर नागरिकांकडून आकारले जातात. यामध्ये आयकर, जीएसटी आणि कॅपिटल गेन टॅक्स सारख्या करांचा समावेश असतो. देशातील सर्व नागरिकांना आपल्या पगारावर किंवा व्यवसायाच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. मात्र, या सर्वांमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या टॉप करदात्यांच्या कंपन्यांच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. या यादीत टाटा समूहाच्या दोन कंपन्या, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा स्टील यांचाही समावेश आहे. पण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या एकाही कंपनीचा टॉप 10 यादीत समावेश नाही.
धोनी, अक्षय कुमारने भरला सर्वाधिक कर
याशिवाय आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, महेंद्रसिंग धोनी 38 कोटी रुपयांचा कर भरून सर्वात मोठा करदाता बनला आहे. तर त्याच्यानंतर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने सर्वाधिक कर भरला. अक्षय कुमारने सरकारला एकुण २९.५ कोटी रुपये आयकर भरला आहे. दरम्यान जागतिक पातळीवरील विचार करता, जेफ बेझोस यांनी 2014 ते 2018 दरम्यान यूएस सरकारला 973 दशलक्ष डॉलर कर भरला आहे. ते जगातील सर्वाधिक कर भरणारे करदाते मानले जातात.
हेही वाचा – ‘रिलायन्स’ नावावरून पुन्हा नवीन वाद; अनिल अंबानींची एनसीएलटीमध्ये धाव, मंगळवारी सुनावणी!
रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज सलग 21 वर्षांपासून फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये स्थान मिळवत आहे. कंपनीने 20,376 कोटी रुपयांचा कर भरून, या यादीत भारतात पहिले स्थान मिळवले आहे. तेलापासून दूरसंचारपर्यंत अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल 9,74,864 कोटी रुपये होता. तर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) दुसऱ्या स्थानावर आहे. या बँकेने सरकारला 16,973 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
देशातील सर्वात मोठ्या बँक असलेल्या एसबीआयचा महसूल 3,50,845 कोटी रुपये इतका आहे. या यादीमध्ये एचडीएफसी बँक यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. एचडीएफसी बॅंकेने 15,350 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी कंपनीने 14,604 कोटी रुपयांचा कर भरला आहे. आयसीआयसीआय बँक 11,793 कोटी रुपये भरून पाचव्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कर भरणारे राज्य
दरम्यान सर्वाधिक कर भरणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ओएनजीसी सहाव्या स्थानावर आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपनीने 10,273 कोटी रुपये कर सरकारला भरला आहे. टाटा स्टीलने 10,160 कोटी रुपये भरून, 7 वे स्थान मिळवले आहे. यानंतर कोल इंडियाचा आठवा क्रमांक येतो. या सरकारी कंपनीने 9,876 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर यादीमध्ये इन्फोसिस ही आयटी कंपनी 9 व्या क्रमांकावर आहे. इन्फोसिसने 9,214 कोटी रुपयांचा कर भरला आहे. दरम्यान, ॲक्सिस बँकेला १० व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. अॅक्सिस बँकेने 7,326 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कर भरणारे राज्य असून, गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती कायम आहे.