फोटो सौजन्य- नवराष्ट्र टीम
Ayush PG entrance exam date: नीट, यूजीसी नेट सारख्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट (AIAPGET) २०२६ शी संबंधित एक नवीन प्रकरण समोर आले आहे. यामुळे या परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. AIAPGET परीक्षेदरम्यान जयपूरमधील एका परीक्षा केंद्रावर वीज गेल्यामुळे ४९ उमेदवारांना आपली परीक्षा पूर्ण करता आली नाही. यामुळे एनटीएच्या परीक्षा व्यवस्थेवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जयपूर केंद्रावर ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करणाऱ्या एजन्सीविरुद्ध कारवाई केली आहे. परीक्षा आयोजित करणारी एजन्सी ‘M/s Eduquity Career Technologies Pvt. Ltd.’ (एडुक्यूटी करियर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड) च्या विरोधात एनटीएने कारवाई सुरू केली आहे आणि परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा केली आहे.
देशभरातील सुमारे २०५ परीक्षा केंद्रांवर २२ ऑगस्ट २०२६ रोजी AIAPGET परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ५१,४८२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४९,८६७ उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते. मात्र, जयपूरमधील एका परीक्षा केंद्रावर वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे ४९ उमेदवार आपली परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे एनटीने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एनटीएच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, AIAPGET च्या री-एग्जामची तारीख १ सप्टेंबर २०२६ ही आहे. एनटीएमतर्फे री-एग्जामशी संबंधित आवश्यक माहिती उमेदवारांना उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवारांना असा सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी परीक्षेसंबंधी पुढील माहिती आणि त्यांच्या सुधारित प्रवेशपत्रावर लक्ष ठेवावे.
नाही, एनटीएच्या अधिकृत अधिसूचनेनुसार सर्व ५१,४८२ उमेदवारांसाठी ही परीक्षा १ सप्टेंबर २०२६ रोजी पुन्हा घेतली जाणार नाही. या परीक्षेत केवळ त्या ४९ उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, ज्यांना वीज गेल्यामुळे समस्यांचा सामना करावा लागला होता. या प्रभावित उमेदवारांसाठी १ सप्टेंबर २०२६ रोजी AIAPGET री-एग्जाम होईल.
ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स री-टेस्टमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी पुन्हा प्रवेशपत्र जारी केले जाईल. १ सप्टेंबर रोजी परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राच्या तपशीलासह उमेदवारांसाठी प्रवेशपत्र जारी केले जाईल. सर्व ४९ उमेदवारांना सुधारित प्रवेशपत्राशी संबंधित अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जयपूर परीक्षा केंद्रावर घडलेल्या या घटनेनंतर एनटीएने एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. AIAPGET परीक्षा संचालनातील निष्काळजीपणाबद्दल एजन्सीकडे स्पष्टीकरण मागितले गेले आहे. एनटीएने स्पष्ट केले आहे की, या नोटिसीचे समाधान होईपर्यंत एडुक्यूटीचे एनटीए सोबतचे पॅनेलमेंट तातडीने प्रभावाने निलंबित राहील.
परीक्षा पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांना झालेल्या गैरसोयीबद्दल एनटीएने खेद व्यक्त केला आहे. प्रभावित उमेदवारांना परीक्षा पूर्ण करण्याची संधी मिळावी, म्हणून एजन्सीने री-एग्जामची व्यवस्था केली आहे. जयपूर केंद्रावरील या घटनेने परीक्षा संचालनातील वीज पुरवठा, तांत्रिक व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांच्या पुरेशा तयारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता सर्वांचे लक्ष एनटीएच्या तपासावर आणि एडुक्यूटीच्या उत्तरावर लागले आहे.






