फोटो सौजन्य - Social Media
नीता परब : मुंबई विद्यापीठ येथे महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करण्यासाठी ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत संयुक्त जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानोत्सवाची सुरुवात ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘नवीन ग्रंथालय’ येथे दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शनाने होणार आहे. भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या भारतीय संविधान मधील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमांद्वारे दिला जाणार आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी असतील. याच दिवशी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक युग पुरुष” या विषयावर डॉ. सुधीर गाडे यांचे व्याख्यान आणि संशोधक विद्यार्थ्यांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.
९ एप्रिल रोजी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान व एकपात्री प्रयोग सादर होईल, तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील बाबासाहेबांवर परिसंवाद होणार आहे. १० एप्रिल रोजी महाड सत्याग्रह या ऐतिहासिक चळवळीच्या सामाजिक आशयावर चर्चा होईल आणि ‘शिवराय ते भीमराय’ जलसा व भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केली जाईल.
११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या विचारधारेवर राज्यस्तरीय परिसंवाद, भीमगीत स्पर्धा, ‘घटनात्मक न्यायशास्त्र’ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद, प्रश्नमंजुषा आणि ‘खुले पत्रलेखन’ असे विविध उपक्रम पार पडतील. १४ एप्रिल रोजी सप्ताहाचा समारोप होणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘संविधान रॅली’ काढण्यात येईल. ही रॅली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ ते ‘कवीवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्य भवन’ दरम्यान होईल. त्यानंतर डॉ. भीमराव भोसले यांचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने होणार आहे. हा सप्ताह केवळ स्मरणोत्सव नसून सामाजिक जाणीव, वैचारिक जागर आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.






