फोटो सौजन्य - Social Media
शिक्षक बनण्यासाठी अनेक कोर्सेस आहेत. जर तुम्ही या क्षेत्रात काम करू पाहत आहात तर अनेक जण तुम्हाला बीएलएड पदवी घेण्याचा सल्ला देतील. पण आता हा कोर्स कायमस्वरूपी बंद होत आहे. २०२६ मध्ये नव्या एज्युकेशन पॉलिसीनुसार बीएलएड हा ४ वर्षांचा कोर्स पूर्णपणे बंद होणार आहे. हा कोर्स दिल्ली विद्यापीठात सुरु होता. याबाबत नवीन गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत.
या मोठ्या निर्णयावर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) चेअरमन पंकज अरोड़ा म्हणाले, “या वर्षापर्यंत B.El.Ed मध्ये प्रवेश सुरू राहतील, पण 2026 पासून नव्या प्रवेशांना बंदी असेल. आम्ही प्रस्ताव दिला आहे की हा कार्यक्रम ITEP मध्ये रूपांतरित केला जावा. आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुसार नवीन प्रोग्रॅम्स आणत आहोत, ज्यामुळे जुन्या कोर्सेसना नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल.” या कार्यक्रमाला २०२६-२७ शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पुढच्या वर्षीपासून नव्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे.
B.El.Ed चे रूपांतर ITEP मध्ये करण्यात येईल. B.El.Ed चे शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना ITEP मध्ये स्थानांतरित व्हावे लागेल. म्हणजे आता जे B.El.Ed करत आहेत त्यांना ITEP मध्ये प्रवेश देण्यात येईल. ITEP हा चार वर्षांचा शिक्षकी प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे, जो 12वी नंतर करता येतो. हा कोर्स BA B.Ed, BSc B.Ed आणि BCom B.Ed या स्वरूपात उपलब्ध असेल.
2023-24 मध्ये हा कोर्स काही संस्थांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला होता. आता 2025-26 पासून तो नियमित अभ्यासक्रम म्हणून लागू केला जाणार आहे. ITEPमध्ये योग शिक्षण, शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण आणि कला शिक्षण या चार विशेष अभ्यासक्रमांचा समावेश असेल. दिल्ली विद्यापीठाने 1994-95 शैक्षणिक वर्षात B.El.Ed कार्यक्रम सुरू केला होता. NCTEने 1999 मध्ये या अभ्यासक्रमासाठी पहिल्यांदाच अधिकृत मान्यता आणि नियमन जारी केले.
2014 मध्ये NCTEने शिक्षक शिक्षण कार्यक्रमांसाठी नवीन निकष ठरवले, ज्यामध्ये B.El.Ed हा एक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम म्हणून परिभाषित करण्यात आला. हा अभ्यासक्रम प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर (इयत्ता 1 ते 8) अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तयार करतो. 2026 नंतर हा अभ्यासक्रम पूर्णपणे ITEP मध्ये समाविष्ट केला जाणार आहे.