फोटो सौजन्य - Social Media
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET सेल) तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘सीईटी-अटल’ या विशेष उपक्रमात आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती देत या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘सीईटी-अटल’ उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करतो. यात मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्ट्सचा समावेश असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्याची संधी मिळते. या सराव परीक्षांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, तसेच परीक्षेच्या तणावावर मात करून यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, या सायकोमेट्रिक टेस्ट्स विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्र निवडण्यास मदत करतात. त्यामुळे हा उपक्रम केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअर विकासाला प्रोत्साहन देणारा ठरेल.
या उपक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग असून, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यांसारख्या विविध विद्याशाखांचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधी मिळाव्यात आणि त्यांना प्रवेश परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेश परीक्षांचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मदत करण्याचा यामागील उद्देश आहे.
सीईटी-अटल उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. विविध शैक्षणिक संस्था, डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि अन्य प्रचारतंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवली जात आहे. यामुळे विद्यार्थी वेळेपूर्वी तयारी करून परीक्षेतील यशासाठी अधिक आत्मविश्वासाने प्रयत्न करू शकतील.
विद्यार्थ्यांना परीक्षांच्या वेळापत्रकासह महत्त्वाची माहिती मिळावी, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने हा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपली नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org/ याला भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.