फोटो सौजन्य - Social Media
मुंबई येथे पार पडलेल्या करिअर कट्टा उपक्रमाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात विरारमधील विवा महाविद्यालयाने तब्बल ११ पुरस्कार पटकावत राज्यात आपला दबदबा सिद्ध केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत होते. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. करुणा गोकर्ण, तसेच विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या माध्यमातून करण्यात आला.
विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या विवा महाविद्यालयाने या सोहळ्यात सर्वाधिक ११ पुरस्कार पटकावत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या अंतर्गत भास्कर वामन ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स, यशवंत केशव पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स आणि विद्या दयानंद पाटील कला महाविद्यालय (विवा कॉलेज) यांना “उत्कृष्ट राज्यस्तरीय प्रथम महाविद्यालय” हा मानाचा किताब मिळाला. याशिवाय प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांना “उत्कृष्ट विभागीय समन्वयक” म्हणून सन्मानित करण्यात आले. मुंबई विभागात प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट विभागीय महाविद्यालय, उत्कृष्ट करिअर संसद, तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय असे अनेक सन्मान विवा महाविद्यालयाच्या नावे जमा झाले.
विद्यार्थ्यांनीही या यशात मोलाचा वाटा उचलला. राज्यस्तरीय रिल स्पर्धा २०२५ मध्ये भावेश विधाते याने प्रथम क्रमांक पटकावला, तर पालघर जिल्हास्तरीय स्पर्धेत चिन्मय भोईर याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच AWS करिअर टूरमध्ये राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवत महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली. या सर्व कामगिरीमुळे विवा महाविद्यालयाने शिक्षण, कौशल्यविकास आणि स्पर्धात्मकता या सर्वच क्षेत्रांत उत्कृष्टता दाखवली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात विवा महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या यशामुळे महाविद्यालयाचे नाव राज्यभर उजळले असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर, व्यवस्थापन समिती सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. राज्यात सर्वाधिक ११ पुरस्कार पटकावून विवा महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्ता, सातत्य आणि कर्तृत्वाची ठळक छाप उमटवली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करण्याचा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात येत आहे.






