फोटो सौजन्य - Social Media
CAT 2025 च्या निकालात यंदा विक्रमी कामगिरी पाहायला मिळाली आहे. एकूण १२ उमेदवारांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत, तर २६ उमेदवारांनी ९९.९९ पर्सेंटाइल गुण प्राप्त केले आहेत. म्हणजेच १०० आणि ९९.९९ पर्सेंटाइल मिळवणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या ३८ आहे. यामध्ये ३२ पुरुष आणि ४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
CAT 2025 परीक्षा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली होती. ही परीक्षा देशभरातील १७० शहरांमध्ये असलेल्या ३३९ परीक्षा केंद्रांवर, तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये (शिफ्टमध्ये) घेण्यात आली होती. परीक्षेनंतर ४ डिसेंबर २०२५ रोजी तात्पुरती (Provisional) उत्तरतालिका जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांकडून हरकती मागवून घेतल्यानंतर १७ डिसेंबर २०२५ रोजी अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. याच अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे CAT 2025 चा निकाल तयार करण्यात आला आहे. यंदा सुमारे २.५८ लाख उमेदवारांनी CAT परीक्षा दिली होती.
CAT 2025 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता IIMs आणि इतर व्यवस्थापन संस्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्येक IIM आपल्या स्वतंत्र निवड निकषांनुसार उमेदवारांची शॉर्टलिस्ट जाहीर करेल. ही यादी संबंधित IIM च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात पर्सनल इंटरव्ह्यू (PI), ग्रुप डिस्कशन (GD) किंवा रिटन एबिलिटी टेस्ट (WAT) साठी बोलावले जाईल. इंटरव्ह्यू कॉल लेटर उमेदवारांना स्वतंत्रपणे पाठवले जातील. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संबंधित IIM च्या वेबसाइट तपासत राहावे आणि पुढील तयारीला सुरुवात करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
IIM कोझिकोडच्या वतीने आयोजित CAT 2025 परीक्षेचा अंतिम निकाल २४ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपले स्कोअरकार्ड पाहण्यासाठी iimcat.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
स्कोअरकार्ड पाहण्यासाठी उमेदवारांकडे नोंदणी क्रमांक (Registration/Application Number) आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे.






