फोटो सौजन्य - Social Media
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (State CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (MCA) आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (M.HMCT) या अभ्यासक्रमांसाठी सीईटीद्वारे होणाऱ्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख आता १८ फेब्रुवारी २०२६ करण्यात आली आहे, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे.
सीईटी कक्षाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एम.एचएमसीटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीची मुदत ७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ अशी होती. तर एमसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणी ७ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा विचार करून आणि अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एमसीए अभ्यासक्रमासाठी एकूण ३१ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे. तुलनेने एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमासाठी केवळ ४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची नोंद आहे. एमसीए अभ्यासक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतानाच, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अपेक्षेइतका प्रतिसाद मिळालेला नाही, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
प्रवेश परीक्षांच्या तारखांबाबत बोलायचे झाल्यास, एमसीए या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा ३० मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर एम.एचएमसीटी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होणार असल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. या परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर घेतल्या जाणार असून, परीक्षेच्या आयोजनासाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.
मागील वर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी घेण्यात आलेल्या एमसीए सीईटी प्रवेश परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या वेळी तब्बल ५६ हजार २५७ विद्यार्थ्यांनी एमसीए अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती. यंदा सध्या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता, पुढील काही दिवसांत नोंदणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, मुदतवाढीचा लाभ घेऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत प्रवेश नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती, वेळापत्रक आणि सूचना अधिकृत वेबसाइटवरूनच तपासाव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.






