आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार
परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावेत, तसेच परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता निश्चिंतपणे परीक्षेला सामोरे जावे, तसेच काही अडचण असल्यास तत्काळ केंद्रप्रमुख किंवा परीक्षा निरीक्षकांशी संपर्क साधावा, अशी माहिती परीक्षा निरीक्षक सीमा सिद्दिकी (सभु विद्यालय आर्ट अँड कॉमर्स कॉलेज) यांनी दिली.
कोणत्याही गोंधळाशिवाय या परीक्षा पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. एकीकडे शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबवून विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार न करता परीक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर या अभियानाच्या अंमलबजावणीत पोलिसांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासाठी त्यांनी नेमकी काय खबरदारी घेतली आहे. यासंदर्भात ज्युनियर कॉलेजच्या vice-principal डॉ. अंजली पुरंदरे यांनी नवराष्ट्राशी संवाद साधतांना सांगितले. दरम्यान, शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात गर्दी करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच नियमाचा भंग केल्यास कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी ठाणे जिल्हा शिक्षण विभागा मार्फत सहा भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत. तर, जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली देखील तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. यंदा जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेसाठी, अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज हे संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत किंवा केंद्रावर रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, सतत शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, विशेषज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी देविदास महाजन यांनी महिला विशेष पथकाच्या समावेशाबाबत माहिती दिली.






