फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत (CISF) हेड कॉन्स्टेबल पदांसाठी स्पोर्ट्स कोट्यांतर्गत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यासाठी एकूण 403 पदे उपलब्ध असून, ही भरती 17 ते 23 मे 2025 दरम्यान प्रकाशित झालेल्या रोजगार समाचारामधून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 18 मे 2025 पासून सुरू झाली असून 6 जून 2025 ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असणे आवश्यक आहे. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल (स्पोर्ट्स कोटा) भरतीसाठी निवड प्रक्रिया इतर भरतींपेक्षा थोडी वेगळी आणि अधिक काटेकोर आहे. सर्वप्रथम अर्जदार उमेदवारांची ट्रायल टेस्ट घेतली जाईल, ज्यामध्ये त्यांच्या संबंधित क्रीडा प्रकारातील प्रत्यक्ष कौशल्यांची तपासणी केली जाईल. ही चाचणी पार केल्यानंतर प्रावीण्य चाचणी घेतली जाईल, ज्यात उमेदवाराने आधी कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, त्यांनी कोणते यश संपादन केले आहे, याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर उमेदवारांची शारीरिक मापदंड तपासणी (PST), कागदपत्रांची पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी होईल. संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गुणवत्ता आधारे होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य तयारीने अर्ज करावा. ही भरती केवळ क्रीडापटूंना उद्देशून आहे, त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, मान्यताप्राप्त क्रीडा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर भेट द्यावी लागेल. सर्वप्रथम भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करावी. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज फी भरावी आणि अंतिम फॉर्म सबमिट करावा. अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट घेणे देखील आवश्यक आहे, जे भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरू शकते. ही भरती क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीसह आपल्या खेळातील कौशल्याचा उपयोग करून देशसेवेचा भाग होण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे जे उमेदवार आपल्या खेळातील गुणवत्ता सिद्ध करू शकतात, त्यांनी ही संधी हातची जाऊ देऊ नये. योग्य नियोजन, तयारी आणि आत्मविश्वासासह अर्ज केल्यास ही भरती तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकते.