इटलीला 24 धावांनी धूळ चारत इंग्लंडचा सुपर 8 मध्ये प्रवेश(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs ITA, T20 World Cup 2026 : २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा २९ वा सामना इंग्लंड आणि इटली यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने इटलीचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून इटलीसमोर २०३ धावांचे लक्ष्य उभे केले होते. प्रतिउत्तरात इटली संघ २० षटकांत १७८ धावांवर गारद झाला.
कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडला तिसऱ्याच षटकात २१ धावांवर पहिला झटका बसला. जोस बटलर ३ धावा करून माघारी गेला. त्यानंतर सलामीवीर फील साल्ट आणि जेकब बेथेल यांनी ३३ धावांची भागीदारी रचली, त्यानंतर फील साल्ट १५ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर जेकब बेथेल, टॉम बॅंटन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेकब बेथेल २३ धवा करून बाद झाला तर टॉम बॅंटन ३० धावांवर माघारी गेला. कर्णधार हॅरी ब्रुक काही खास करू शकला नाही. तो १४ धावा करून बाद झाला. सॅम करनही २५ धावा करून माघारी गेला.त्यानंतर मात्र संघ चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत असताना मैदानात आलेल्या विल जॅक्सने मात्र इटलीच्या गोलंदाजीवर चांगलेच आक्रमण चढवत इंग्लंडचा डाव पुढे नेला. जेमी ओव्हरटन १५ धावांवर बाद झाला, विल जॅक्सने आपले अर्धशतक पूर्ण करून संघाला देखील २०२ पर्यंत पोहचवले. तो २२ चेंडूत ५३ धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. तसेच जोफ्रा आर्चर १ धाव काढून नाबाद राहिला. इटलीकडून ग्रँट स्टीवर्ट आणि क्रिशन कलुगामेज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जेजे स्मट्स, अली हसन आणि बेन मॅनेंटी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
England fend off Italy’s fightback to clinch win in Kolkata at the #T20WorldCup 👊 📝: https://t.co/PBfNBwjiX1 pic.twitter.com/mS0SQMAijj — ICC (@ICC) February 16, 2026
इंग्लंडने दिलेल्या २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इटलीची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने फक्त १ धावात दोन विकेट गमावल्या आणि २२ धावांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी आपली तिसरी विकेट गमावली. इटली संघ चांगलाच अडचणीत आला असे वाटत असताना जस्टिन मोस्का आणि बेन मेनेंटी यांनी चौथ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ९२ धावांची शानदार भागीदारी रचली आणि संघाला सामन्यात परत आणले होते. बेन मेनेंटी यांनी २५ चेंडूत ६० धावांची आक्रमक खेळी केली. तर जस्टिन मोस्का यांनी २३ चेंडूत ४५ धावा फटकावल्या. परंतु, या दोघांना संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही.
हेही वाचा : AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास
बेन मेनेंटी बाद झाल्यानंतर, इटलीचा डाव पुन्हा एकदा कोसळला आणि संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला आणि इटलीला लक्ष्याच्या अंतरावर रोखले. इंग्लंडकडून सॅम करने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. या विजयासह, इंग्लंडने (२०२६ च्या टी-२० विश्वचषका)सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले, तर या पराभवामुळे इटलीला मोठा धक्का बसला.






