फोटो सौजन्य - Social Media
स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ या विशेष स्वच्छता अभियानाचा १ जुलैपासून उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ सारसोळे येथील नमुंमपा शाळा क्रमांक 92 व 121 येथे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सहभागातून झाला.
या अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण व डासमुक्ती यावर विशेष भर दिला जात आहे. अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणे आणि त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी करणे हे आहे. जुलै महिनाभर विविध ठिकाणी उपक्रम राबवून नवी मुंबईकरांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा मानस महापालिकेचा आहे.
उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ २ च्या उपआयुक्त सौ. स्मिता काळे, परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, सहायक आयुक्त जयंत जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यावर आधारित माहितीपत्रके वितरित करण्यात आली. त्याचबरोबर ‘आरंभ क्रिएशन्स’च्या कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या किटकजन्य आजारांपासून संरक्षण कसे करावे याची माहिती देणारे पोस्टर्स व प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
या उपक्रमात फक्त शाळाच नव्हे, तर रुग्णालये, उद्याने याठिकाणीही स्थानिक सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले. संपूर्ण जुलै महिन्यात महानगरपालिका क्षेत्रात हा अभियान उपक्रम सुरू राहणार असून नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, विविध सामाजिक संघटना यांना यात सहभागी होण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. स्वच्छतेचा संदेश देणारे हे अभियान फक्त आरोग्य सुधारण्यासाठी नव्हे, तर एक जबाबदार नागरीक म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका बजावण्यासाठी आहे.