फोटो सौजन्य - Social Media
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा (जून पॅटर्न २०१३) बुधवार, (Marathwada University) म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. यासाठी चार जिल्ह्यांमध्ये समन्वय विभागाच्या अंतर्गत विशेष तयारी करण्यात आली आहे. सहायक कुलसचिव भगवान फड, राजेंद्र गांगुर्डे आणि महेंद्र पैठणे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ३३ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या परीक्षेच्या सर्व आयोजनाची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
ऑक्टोबर महिन्यात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये परीक्षा वेळापत्रक निश्चित करण्यात आले. ठरलेल्या वेळापत्रकानुसार जून पॅटर्न २०१३ अंतर्गत बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम. यांसारख्या एकूण ३२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा १२ नोव्हेंबरपासून सुरू होतील.
दरम्यान, नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अन्वये राबविण्यात आलेल्या अभ्यासक्रमांनुसार बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर एम.ए., एम.एस्सी., आणि एम.कॉम. या पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ नोव्हेंबरपासून घेण्यात येतील. अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा मात्र जानेवारी २०२६ मध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय पर्यावरणशास्त्र (ईव्हीएस) आणि भारतीय संविधान या सर्वसाधारण विषयांच्या परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. परीक्षा केंद्रांवरील सर्व तयारी पूर्ण झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.
२३३ परीक्षा केंद्रे आणि ३२ भरारी पथकांची स्थापना
या सर्व परीक्षांसाठी सुमारे तीन लाख ५९ हजार विद्यार्थी बसणार आहेत. एकूण २३३ परीक्षा केंद्रे चार जिल्ह्यांत उभारण्यात आली आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९२ केंद्रे, जालना जिल्ह्यात ५२, बीड जिल्ह्यात ६५ आणि धाराशिव जिल्ह्यात २४ केंद्रांचा समावेश आहे. सर्व केंद्रांवर शिस्त, पारदर्शकता आणि गडबडरहित परीक्षा पार पडावी यासाठी ३२ भरारी पथके कार्यरत राहतील.
दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ व २ डिसेंबर रोजी विद्यापीठाने सर्व परीक्षांना सुट्टी दिली आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा विभागाने केले आहे. या सर्व तयारीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांचा प्रारंभ अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार असून, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.






