फोटो सौजन्य - Social Media
जेव्हा एखाद्या सामान्य कुटुंबातील मुलगी असामान्य यश मिळवते, तेव्हा ती केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान ठरते. अशीच एक प्रेरणादायी आणि दमदार कथा आहे मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील तपस्या परिहार यांची, ज्यांनी कोणतीही कोचिंग न करता, केवळ आत्मशिस्त, जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर UPSC परीक्षेत AIR 23 मिळवत IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न साकारले. तपस्या परिहार एका शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयातून झाले. पुढे पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी त्यांनी हार मानली नाही. कोचिंग क्लासऐवजी त्यांनी स्वअभ्यासावर भर दिला. दररोज मॉक टेस्ट्स, चालू घडामोडी यावर लक्ष केंद्रित करत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात प्रचंड यश मिळवलं.
तपस्या यांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सामाजिक रूढींना दिलेली खुली चुनौती. आपल्या विवाहात ‘कन्यादान’ प्रथा नाकारून त्यांनी एक ठाम संदेश दिला की स्त्री ही वस्तू नाही, जिला दान केलं जावं. हा निर्णय अनेक तरुणींना सशक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतो.
प्रशासकीय सेवेतही त्यांनी प्रामाणिकपणाची अतुलनीय मिसाल उभी केली. जेव्हा त्या छत्तरपूर जिल्हा परिषदेत CEO म्हणून कार्यरत होत्या, तेव्हा एक निलंबित शिक्षक त्यांना ५०,००० रुपयांची लाच देण्यासाठी आला. तपस्या यांनी लाच स्वीकारण्याऐवजी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केलं. या धाडसी कृतीनंतर त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून संबोधण्यात आलं.
आज तपस्या परिहार त्या लाखो तरुण-तरुणींसाठी दीपस्तंभ बनल्या आहेत, जे ग्रामीण भागातून येऊन मोठी स्वप्न पाहतात. त्यांची कथा शिकवते की अपयश हे शेवट नसून सुरुवात असते. आत्मशिस्त, सचोटी आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. तपस्या यांचा प्रवास म्हणजे एका शेतकऱ्याच्या मुलीपासून एका प्रेरणादायी IAS अधिकारीपर्यंतचा प्रवास, जो प्रत्येकाला सांगतो की, “स्वप्न बघा… कारण तुम्हीही ते पूर्ण करू शकता!”