फोटो सौजन्य - Social Media
परराज्यात जाण्याची तयारी असल्यास ही भरती तुमच्यासाठी आहे कारण हरियाणा कौशल्य रोजगार निगम (HKRN) मार्फत विविध विभागांमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हरियाणा राज्य सरकारने स्थापन केलेल्या हरियाणा कौशल्य रोजगार निगम लिमिटेडचा उद्देश सरकारी विभाग, विद्यापीठे, कॉर्पोरेशन आणि इतर शासकीय संस्थांमध्ये कराराधारित व आउटसोर्सिंग पद्धतीने कर्मचारी नियुक्त करणे हा आहे. यासाठी अधिकृत पोर्टल hkrnl.itiharyana.gov.in या कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. या भरतीअंतर्गत बाईक रायडर, टेक्निकल असोसिएट, होम बेस्ड केअरगिव्हर, सेरामिक टाइलिंग, मेसन, प्लास्टरिंग वर्क, ड्रायवॉल वर्कर अशा विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. (HKRN Recruitment 2025 posts for bike riders)
हरियाणातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. विशेषतः बाईक रायडर पदासाठी स्वतंत्र भरती घेतली जात असून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. काही पदे ‘ओव्हरसीज’ म्हणजे परदेशात कामासाठी असल्यामुळे अनुभवी उमेदवारांना याचा लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, टेक्निकल असोसिएट पदासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवले असून सेरामिक टाइलिंग, मेसन, प्लास्टरिंग वर्क आणि ड्रायवॉल वर्कर पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. होम-बेस्ड केअरगिव्हर पदासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
या भरतीतील वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षे ठेवण्यात आली असून वयाची गणना १ जानेवारी २०२५ रोजीच्या स्थितीनुसार केली जाणार आहे. राखीव प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार सवलत देण्यात येईल. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ₹२३६ इतके समान ठेवण्यात आले असून पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करावे लागेल.
विविध पदांसाठीची जागा खालीलप्रमाणे आहे: बाईक रायडर ३०० पदे, सेरामिक टाइलिंग १०,००० पदे, ड्रायवॉल वर्कर ३००, होम बेस्ड केअरगिव्हर ५,०००, मेसन ३००, प्लास्टरिंग वर्क १,००० पदे, तर टेक्निकल असोसिएट पदांची संख्या लवकरच जाहीर होणार आहे. या भरतीत निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, मुलाखत (आवश्यक असल्यास), कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचणी या टप्प्यांद्वारे पूर्ण केली जाईल. HKRN मार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगार संधींच्या मदतीने उमेदवारांना परदेशात रोजगाराची संधी, प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्यवर्धन कोर्सेस आणि ऑनलाइन सर्टिफिकेशनची सुविधा उपलब्ध होते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील “Apply Online” लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, शुल्क भरावे आणि शेवटी अर्जाची प्रिंटआउट काढावी.
हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु झालेल्या या भरतीमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः बाईक रायडर आणि इतर कौशल्याधारित पदांसाठी इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून ही संधी साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.






