फोटो सौजन्य - Social Media
पर्यावरण संवर्धन, अक्षय ऊर्जा वापर आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कलिना संकुलात तब्बल २०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची अधिकृत सुरूवात करण्यात आली असून, यामुळे विद्यापीठ ‘ग्रीन कॅम्पस’च्या दिशेने मोठी झेप घेत असल्याचे मानले जात आहे.
मुंबई विद्यापीठाने यापूर्वी ठाणे उपपरिसर आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस, कल्याण येथे सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत. त्याच धर्तीवर आता कलिना संकुलातही संपूर्ण ऊर्जा व्यवस्थापन सौरऊर्जेतूनच चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी कॉमेट इंडिया आणि युनायटेड वे मुंबई या दोन संस्थांसोबत विद्यापीठाने सामंजस्य करार (MoU) केला आहे. या कराराअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रणालीमुळे संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, फिरोजशाह मेहता भवन, सी. डी. देशमुख भवन, जुना लेक्चर कॉम्प्लेक्स, लाईफ सायन्स बिल्डिंग, मौलाना अब्दुल कलाम भवन आणि जीवभौतिकशास्त्र विभाग या सातही प्रमुख इमारतींमध्ये पूर्णतः अक्षय ऊर्जा वापरली जाणार आहे.
२०० किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे विद्यापीठाला दरमहा ४ लाखांहून अधिक विजेच्या खर्चात बचत होणार आहे. या सौर प्रकल्पात नेट मीटरिंग प्रणालीचा समावेश असून, तयार होणारी वीज संपूर्ण इमारतींना पुरवली जाईल. त्यासोबतच निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा नेट मीटरद्वारे शिल्लक ठेवून तिचे व्यवस्थापनही करता येणार आहे. अंदाजे २०० किलोवॅट सौर पॅनेल प्रणालीद्वारे दरवर्षी जवळपास २,६०,००० युनिट वीज उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सौरऊर्जेसोबतच मुंबई विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत शाश्वत विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प राबवले आहेत. यात सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, पर्जन्यजल संधारण व्यवस्था, ऊर्जा बचत योजना, कचरा व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. ‘ग्रीन कॅम्पस’ उपक्रमांतर्गत विद्यापीठ विद्यार्थी आणि अध्यापकांना पर्यावरण-जाणिवेची प्रेरणा देणारे विविध कार्यक्रमही राबवत आहे. त्यात क्लायमेट स्किल प्रोग्राम्स, पर्यावरण जागरूकता मोहीमा आणि वृक्षारोपण उपक्रमांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “मुंबई विद्यापीठाची ही हरित उर्जेकडे वाटचाल पर्यावरण संवर्धन, अक्षय ऊर्जा वापर आणि शाश्वत विकास या तिन्ही क्षेत्रांमध्ये निर्णायक टप्पा आहे. पुढील काळात विद्यापीठ कॅम्पस अधिक पर्यावरणस्नेही आणि शाश्वत करण्याचे आमचे ध्येय आहे.”
मुंबई विद्यापीठाने उचललेले हे पाऊल शिक्षण क्षेत्रात पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचा आदर्श निर्माण करणारे ठरत असून, राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी पाऊल ठरण्याची शक्यता आहे.






