फोटो सौजन्य - Social Media
या भरतीसाठी उमेदवारांनी आरबीआयच्या अधिकृत संधी पोर्टल opportunities.rbi.org.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ‘Current Vacancies’ विभागात जाऊन Lateral Recruitment संदर्भातील जाहिरात निवडावी. त्यानंतर संबंधित पदावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज लिंक उघडावी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लॉगइन करून अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर अॅक्नॉलेजमेंट स्लिप आणि ई-पावती डाउनलोड करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येईल, मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे.
पदांचा तपशील
या भरतीअंतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ पदांचा समावेश आहे. त्यामध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, AI/ML स्पेशालिस्ट, रिस्क अॅनालिस्ट, अकाउंट स्पेशालिस्ट, पॉलिसी रिसर्च अॅनालिस्ट, बँकिंग डोमेन स्पेशालिस्ट, क्रेडिट रिस्क व लिक्विडिटी रिस्क तज्ज्ञ अशा अनेक पदांचा समावेश आहे. एकूण ९३ पदांवर ही भरती केली जाणार आहे.
ऑनलाइन नोंदणी व अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२६ असून, त्या दिवशी सायंकाळी ६ वाजता अर्ज प्रक्रिया बंद होईल. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असली तरी साधारणपणे उमेदवारांचे वय २५ ते ४० वर्षांदरम्यान असावे. काही वरिष्ठ पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्षांपर्यंत आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्जांची प्राथमिक छाननी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत प्रक्रिया राबवली जाईल. उमेदवाराची पात्रता, अनुभव आणि मुलाखतीतील कामगिरी यांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फुल-टाईम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाणार आहे.
डेटा, आयटी, सायबर सिक्युरिटी किंवा बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयची ही भरती मोठी संधी मानली जात असून, इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






