फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (ITI) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आदेश दिले आहेत की आयटीआय विद्यार्थ्यांना आता त्यांच्या राहत्या जिल्ह्यातील स्थानिक उद्योगांमध्येच शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) मिळावी. यामुळे हजारो प्रशिक्षणार्थींना घराजवळच अँप्रेंटिसशिपसाठी संधी उपलब्ध होणार आहे.
राज्य शासन ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राबवत असून यामध्ये दरवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून ३० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या किमान २.५% ते कमाल २५% जागा शिकाऊ उमेदवारांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत.
सध्या राज्यात २७ गटातील २५८ निर्देशित व्यवसाय, ३५ क्षेत्रांतील ४१४ वैकल्पिक तंत्रज्ञ, तसेच १२३ इतर व्यवसाय यामध्ये अँप्रेंटिसशिप उपलब्ध आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी व्यवसायानुसार ६ ते ३६ महिन्यांचा असतो. या योजनेंतर्गत प्रशिक्षित तसेच अप्रशिक्षित उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते. स्थानिक उद्योगांमध्येच अँप्रेंटिसशिप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील आस्थापनांमध्येही ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांचाही आढावा घेऊन त्या त्या ट्रेड्स या योजनेंतर्गत समाविष्ट केल्या जात आहेत. तसेच प्रशिक्षण संस्थांना शासनातर्फे आवश्यक ती आर्थिक मदतही दिली जात आहे.
विशेष म्हणजे, पूर्वी बृहन्मुंबई महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील २०० विद्यार्थ्यांना अँप्रेंटिसशिप मिळत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ती प्रक्रिया थांबली होती. आता मंत्री लोढा यांनी पुन्हा ती प्रक्रिया सुरु करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून, लवकरच इतर महापालिकांमधूनही विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपची संधी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.