फोटो सौजन्य - Social Media
पुणेकरांसाठी रोजगाराची एक मोठी आणि महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे गट-ड (वर्ग ४) संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली असून एकूण ३५४ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती होत आहे आणि अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या भरतीत गॅस प्लांट ऑपरेटर, भंडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेश वाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, नाभिक, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, रुग्णपट वाहक, क्ष-किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आया आणि कक्षसेवक अशा पदांचा समावेश आहे.
सर्वाधिक जागा कक्षसेवकासाठी असून एकट्या या पदासाठी तब्बल १६८ जागा आहेत. त्यानंतर आया पदासाठी ३८, चतुर्थ श्रेणी सेवकासाठी ३६, पहारेकरीसाठी २३ आणि क्ष-किरण सेवकासाठी १५ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा आहे आणि शासकीय नोकरीच्या माध्यमातून स्थिर भविष्याची अपेक्षा आहे. अर्ज प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून उमेदवारांना आपला अर्ज सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत देखील हाच दिवस आहे.
या भरतीसंबंधी सर्व माहिती, आवश्यक पात्रता, अटी व शर्ती आणि अर्ज करण्याची पद्धत अधिकृत संकेतस्थळ bjgmcpune.com वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेचा दिनांक व वेळ उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्रावरून कळविण्यात येईल. या भरती प्रक्रियेत पदसंख्या, आरक्षण तसेच इतर अटींमध्ये बदल करण्याचा, प्रक्रिया स्थगित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार ससून रुग्णालय प्रशासनाकडे आहे.
त्यामुळे उमेदवारांनी या संधीचा गांभीर्याने विचार करून योग्य वेळी अर्ज करणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड असलेले आणि स्थिर करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही भरती खूप महत्त्वाची ठरू शकते. शासकीय रुग्णालयातील नोकरीमुळे मिळणारी सुरक्षितता, अनुभव आणि सेवाभाव यामुळे या पदांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करून आपले भविष्य उज्ज्वल करण्याची संधी साधून घ्यावी.