फोटो सौजन्य - Social Media
असम रायफल्सने क्रीडा कोट्यातून जनरल ड्युटी रायफलमन/रायफलवूमन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण ६९ रिक्त पदे भरली जाणार असून त्यामध्ये ३० पदे पुरुष उमेदवारांसाठी तर ३९ पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ assamrifles.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. ही संधी विशेषतः अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे ज्यांनी शैक्षणिक पात्रतेसह क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच ते मान्यताप्राप्त खेळाडू असावेत. वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२५ रोजी गणली जाणार असून उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. शासन नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
निवड प्रक्रियेत उमेदवारांची शारीरिक चाचणी, मोटर एबिलिटी टेस्ट, ट्रायल टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून कसून चाचणी घेतली जाणार आहे. प्रत्येक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड होणार आहे. यामध्ये शारीरिक क्षमतेसोबतच खेळातील प्राविण्य आणि वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिसूचना नीट वाचून आपली पात्रता तपासावी. त्यानंतर दिलेल्या “Apply Online” लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना नियमानुसार शुल्क भरावे लागणार असून अंतिम टप्प्यात अर्जाची प्रिंट काढून ती जतन करून ठेवावी.
असम रायफल्स ही देशातील सर्वात जुन्या पॅरामिलिटरी फोर्सपैकी एक असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या भरतीद्वारे निवड होणाऱ्या तरुणांना केवळ सरकारी नोकरीची संधीच मिळणार नाही तर देशसेवेची संधी देखील उपलब्ध होणार आहे. खेळाडूंसाठी राखीव असलेली ही भरती त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे.