फोटो सौजन्य - Social Media
IPS अधिकारी आदित्य कुमार यांची कहाणी केवळ यशाची नाही, तर अपयशांवर मात करून उभं राहण्याची आहे. त्यांच्या जीवनप्रवासात त्यांनी जवळपास ३३ वेळा अपयशाचा सामना केला, पण त्यांनी एकदाही हार मानली नाही. ही कहाणी प्रत्येक त्या तरुणासाठी प्रेरणादायी आहे जो एक-दोन अपयशांनंतर थांबतो आणि स्वप्नांपासून दूर जातो. आदित्य कुमार यांचे शिक्षण बिहारमधील एका लहानशा गावात झालं. दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर त्यांनी ठाम निश्चय केला की त्यांना सिव्हिल सेवा परीक्षेत यश मिळवून देशसेवेच्या क्षेत्रात योगदान द्यायचं आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण होणं फारच कठीण ठरलं. त्यांनी सुरुवातीला बँक परीक्षा, KVS, SSC, इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा अशा तब्बल ३० पेक्षा अधिक परीक्षा दिल्या पण सगळ्या परीक्षांमध्ये त्यांना अपयशाचाच सामना करावा लागला.
साल २०१३ मध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. गाव सोडून थेट दिल्ली गाठली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. ही तयारी फारच वेगळी आणि खडतर होती. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC प्रीलिम्स दिले, पण त्या परीक्षेत ते पास होऊ शकले नाहीत. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना इंटरव्ह्यूपर्यंत जाण्याची संधी मिळाली, पण ओव्हरकॉन्फिडन्समुळे अंतिम यश हुलकावणी देऊन गेलं. तिसऱ्या प्रयत्नातही अपेक्षित यश मिळालं नाही.
मात्र चौथ्या प्रयत्नात त्यांनी आपली चूक ओळखली, अभ्यासाची दिशा बदलली आणि UPSC CSE 2018 मध्ये अखेर AIR 630 मिळवत IPS पदावर निवड झाली. ही केवळ एक यशकथा नव्हती, तर ती एक प्रेरणादायी मोहीम ठरली. ज्या लोकांनी त्यांची खिल्ली उडवली होती, तेच लोक त्यांच्या मेहनतीचं कौतुक करू लागले. आदित्य कुमार सांगतात की, “अपयश हा शेवट नाही, तो पुढील प्रवासासाठीची तयारी असते. जिथं लोक थांबतात, तिथं जर तुम्ही चालत राहिलात तर एक दिवस यश तुमचं होणारच.” त्यांनी सतत स्वतःला प्रोत्साहन दिलं, आत्मविश्वास गमवला नाही, आणि आपल्या ध्येयावर ठाम राहिले.
आज आदित्य कुमार IPS अधिकारी म्हणून देशसेवेत कार्यरत आहेत आणि त्यांच्या प्रवासातून अनेक तरुण प्रेरणा घेत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “स्वप्न कोणतीही जात, पार्श्वभूमी किंवा शहर विचारून येत नाहीत; त्यासाठी फक्त तुमची जिद्द आणि मेहनत लागते.” त्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे की कितीही अपयशं आली, तरीही जर जिद्द, संयम, आणि न थांबणारी मेहनत असेल, तर कोणतंही स्वप्न साकार होऊ शकतं. त्यांचा प्रवास हेच सांगतो की, “माणूस हरतो तेव्हा नाही, जेव्हा तो अपयशामुळे थांबतो तेव्हा हरतो.” आज आदित्य कुमार ही केवळ नाव नाही, तर ती एक भावना आहे – जिद्दीची, आत्मविश्वासाची आणि कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीची. त्यांची कहाणी प्रत्येक UPSC स्पर्धकाच्या हृदयात नव्याने आशा निर्माण करणारी ठरते.