सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची २६ फेब्रुवारी रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार सांभाळतील, असे पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यातील संवादात सांगितले.
पटेल यांनी चांदपूर देवस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर भंडारा विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत केंद्रीय तपासाची मागणी केली असल्याचे सांगितले. अपघाताच्या दिवशी बारामतीत आलेल्या केंद्रीय मंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीसाठी विनंती करण्यात आली होती. अजित पवार यांच्या अपघातामागे माझा हात असल्याचे आरोप काही लोक करत आहेत, परंतु ते पूर्णपणे चुकीचा आहेत, असे खासदार पटेल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शेवटचे फोनवर बोलणे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसविषयी झाले होते, भ्रष्टाचाराशी काही संबंध नव्हता.
तसेच २६ फेब्रुवारीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर अधिकृत घोषणा होणार आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की, पक्षाला खंबीर नेतृत्व मिळावे, आणि सुनेत्रा पवार ह्या जबाबदारीस पात्र आहेत. बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवरही चर्चा होईल.
हेदेखील वाचा : शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जबाबदारी स्वीकारतील. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदाची आणि दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना, अजित पवार यांचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सर्व काही स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार
सुनेत्रा या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार आहेत आणि या विषयावर एकमत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या उपमुख्यमंत्री असल्याने आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्यामुळे त्या विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व करतील. पुढील दोन आठवड्यात या विषयावर निर्णय अपेक्षित आहे. प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतही भाष्य केले.






