फोटो सौजन्य - Social media
LG इलेकट्रोनिक्स भारतातील अग्रगण्य कंझ्युमर ड्युरेबल ब्रँड आहे. महत्वाचे म्हणजे LG ने नुकतेच एका शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. शिष्यवृत्ती पुरवण्यामागेचे मुख्य उद्देश LG ने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मुलींच्या शिक्षणाला चालना देऊन महिलावर्ग आणखीन सक्षम बनवण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीत मुलींसाठी एक विशेष कोटा आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना खूप मदत होणार असल्याची LG चे म्हणणे आहे.
नोएडा येथील LG इलेक्ट्रॉनिक्सच्या कॉर्पोरेट कार्यालयात या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले, जिथे गलगोटिया युनिव्हर्सिटी, जयपुरिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि लॉयड लॉ कॉलेजमधील विद्वानांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती दोन प्रमुख निकषांवर दिली जाईल: गरज-आधारित आणि गुणवत्ता-आधारित निवड.
गरज आधारित श्रेणीमध्ये २५% शिष्यवृत्ती नम्र पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्ह्यात आली आहे. तर गुणवत्तेच्या आधारे दिली जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर अभ्यास केले तर लक्षात येईल कि या शिष्यवृत्तीस पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याला १२ वी श्रेणीच्या परीक्षेत किमान ७५% गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागेल. त्याचबरोबर त्यापुढील शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना किमान ७ GPA मिळवणे अनिवार्य असणार आहे, तरच विद्यार्थी LG च्या या शिष्यवृत्ती योजनेस पात्र असेल. विशेषतः शिष्यवृत्तीचा 25% वाटा गुणवत्ताधारक महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल, ज्याचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आहे. अर्थसहाय्य हे शिक्षण शुल्काच्या 50% किंवा पदवी (यूजी) विद्यार्थ्यांसाठी 1 लाख रु. पर्यंत आणि पदव्युत्तर (पीजी) विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रु. पर्यंत, जे कमी असेल ते दिले जाईल.
या संदर्भात बोलताना, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) हाँग जु जिओन म्हणाले, “LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया मध्ये, आमची बांधिलकी नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा पुरवण्यापलीकडे आहे; आम्ही अर्थपूर्ण उपक्रमांद्वारे लोकांच्या जीवनात ठोस फरक घडवून आणण्याचे प्रयत्न करतो. आरोग्य आणि पोषण, शिक्षण आणि कौशल्य हे आमच्या CSR प्रयत्नांचे मुख्य क्षेत्रे आहेत. लाइफ्स गुड शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे, आम्ही तरुण मनांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचे आणि त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याचे ध्येय ठेवतो. शिक्षण हे सामाजिक प्रगती आणि आर्थिक सक्षमीकरणाचे मूलभूत घटक असल्याचा आमचा विश्वास आहे.”
हे देखील वाचा : ‘या’ नोकऱ्यांवर आहे AI चे सावट; काही वर्षांत संपण्याची अफाट शक्यता
बडी4स्टडी चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशुतोष बर्नवाल म्हणाले, “लाइफ्स गुड शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे शिक्षणाला समर्थन देण्याच्या वचनबद्धतेबद्दल आम्ही LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे खूप कौतुक करतो. बडी4स्टडी मध्ये, आम्हाला या उपक्रमात सहकार्य करताना अभिमान वाटतो, जे पात्र विद्यार्थ्यांना, विशेषत: वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना, त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यास सक्षम करतो. हा कार्यक्रम भारतातील प्रतिभावान तरुणांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” NGO बडी4स्टडी फाउंडेशनसोबतचा हा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांना आर्थिक अडथळे दूर करून शिक्षणाची संधी देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.