फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Google for Maharashtra Education: ‘जनरेशन अल्फा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शालेय शिक्षकांनाही अद्यायावत तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती असणे अवश्यक असल्याने शालेय शिक्षण विभागाने त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षण गुगल कंपनीमार्फत दिले जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमातून दीड वर्षात राज्याभरातील चार लाखाहून अधिक शिक्षकांना एआय आणि डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल. अलीकडेच शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत या करारावर गुगलच्या वतीने जिओ आणि एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स तसेच शिक्षण विभागाच्या वतीने सहसचिव ताशीलदार यांनी स्वाक्षरी केली. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला निवडक मास्टर ट्रेनरना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर हे प्रशिक्षक राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देतील.
या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना नव्या कौशल्यांनी सुसज्ज करणे अधिक गरजेचे आहे. याद्वारे शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख उपलब्ध करून देण्याचाही समावेश आहे. तसेच हा कार्यक्रम विनामुल्य असल्याने राज्य सरकारवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या उदिष्टांशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये, भाषा प्रयोगशाळा आणि अन्य तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधांच्या वापरांला चालना मिळवण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बदलत्या तंत्रज्ञानाची गरज ओळखून राज्यातील शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम प्रज्ञा आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या शालेय शिक्षणातील वाढता प्रभाव पाहता गुगल कंपनीकडून घेतली जाणारी मदत तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बदल असल्याचे दर्शवत आहे.






