फोटो सौजन्य - Social Media
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग (SEEID) यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय क्षमतावृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन १९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. उद्घाटन सोहळा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.
देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे हा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचा (NCVET) प्रमुख उद्देश आहे. यासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांना मान्यता, मूल्यांकन व योग्य मार्गदर्शन देण्याचे कार्य देखील परिषद करते. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जी, NCVET च्या कार्यकारी सदस्य डॉ. विनीता अग्रवाल, संचालक गुंजन चौधरी, राज्याच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण-दीव तसेच दादरा-नगर हवेली येथील प्रतिनिधी आणि विविध भागधारक देखील सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेत DVET संस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी उपाययोजना चर्चिली जाणार असून, NCVET च्या नियामक भूमिकेवरही सखोल चर्चा होईल. राज्यस्तरीय कौशल्य विकास उपक्रम, मानके व गुणवत्ता हमी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ग्रीन हायड्रोजन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवरील प्रशिक्षण, अवार्डिंग बॉडीज व मूल्यमापन संस्थांची नोंदणी व कार्यपद्धती, विविध कौशल्य उपक्रमांचे एकत्रीकरण तसेच शालेय व उच्च शिक्षण व्यवस्थेत व्यावसायिक शिक्षणाचा समावेश या विषयांवर विशेष सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयातील मान्यवर, महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमातून रोजगारक्षम पिढी घडवण्यासाठी आवश्यक दिशादर्शन होणार असून, व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे.