फोटो सौजन्य - सोशल मीडिया
NEET UG Paper Leak Case Investigation: अभ्यास, कठोर मेहनत आणि स्वप्नांच्या जोरावर दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात, परंतु गेल्या काही वर्षांत ‘पेपर लीक’च्या प्रकरणांंनी त्यांच्या स्वप्नांवर वारंवार पाणी फेरले आहे. कधी देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET’ रद्द झाली, तर कधी शिक्षक बनण्याचे स्वप्न दाखवणारी ‘MAHA TET’. अनेकदा परीक्षेच्या अगदी आधी पेपर लीक झाला, तर काही ठिकाणी परीक्षेनंतर गैरप्रकार समोर आले. चला तर मग जाणून घेऊया गेल्या काही वर्षात कोणत्या मोठ्या परीक्षांना पेपर लीकचा डाग लागला.
वर्ष २०२६ हे पेपर लीकच्या प्रकरणांमुळे सर्वात जास्त चर्चेत राहिले. ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘NEET UG 2026’ या परीक्षेत सुमारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षेनंतर अनेक राज्यांतून पेपर लीकच्या तक्रारी समोर आल्या. व्हॉट्सअॅप आणि काही कोचिंग नेटवर्कच्या माध्यमातून कथित ‘गेस पेपर’ आधीच शेअर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले, ज्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत होते. यानंतर १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली आणि २१ जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली.
NEET नंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली. या परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर लीकची माहिती मिळाल्याने परीक्षा स्थगित करण्यात आली. ठाण्याच्या भिवंडी भागातून पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही लोकांकडे परीक्षेचे प्रश्न आधीच पोहोचले आहेत. तपासादरम्यान जप्त केलेले प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे आढळून आले. यानंतर सरकारने परीक्षा स्थगित केली.
वर्ष २०२४ देखील परीक्षा घोटाळ्यांसाठी चर्चेत राहिले. ‘UGC-NET’ परीक्षा आयोजित झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात रद्द करण्यात आली, ज्याचा फटका ९ लाखांहून अधिक उमेदवारांना बसला. नंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली. याच वर्षी ‘NEET UG 2024’ मध्येही पेपर लीकचे आरोप झाले. व्हॉट्सअॅप ग्रुप आणि संघटित नेटवर्कद्वारे प्रश्नपत्रिका शेअर केल्याचे तपासात समोर आले. याशिवाय, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर ‘NEET-PG’ आणि ‘CSIR-UGC NET’ परीक्षा देखील शेवटच्या क्षणी स्थगित कराव्या लागल्या होत्या.
परीक्षा वारंवार रद्द होण्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक उमेदवार भाड्याच्या खोलीत राहून तयारी करतात, कोचिंगची फी भरतात आणि त्यांचे कुटुंबे आर्थिक भार सोसतात. परीक्षा रद्द झाल्यामुळे मानसिक ताण, आर्थिक नुकसान आणि करिअरला होणारा उशीर यांसारख्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
Rashtrapati Bhavan Recruitment 2026: राष्ट्रपती भवनात सरकारी नोकरी कशी मिळते? जाणून घ्या
सतत समोर येणाऱ्या पेपर लीकच्या प्रकरणांनंतर सरकार आणि परीक्षा यंत्रणा सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा दावा करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, केवळ तंत्रज्ञानच नाही तर परीक्षा यंत्रणांमधील जबाबदारी वाढवणे, कडक कायदेशीर कारवाई आणि संघटित पेपर लीक नेटवर्कवर लगाम लावणे अत्यंत आवश्यक आहे, तरच विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करता येईल.






