फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवीन अभ्यासक्रम सुरू होणार असून, यामुळे राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालकांनी या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. तसेच, चेंबूर येथे एक उच्चस्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक) आणि ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे काळाची गरज ओळखून नव्याने सुरू करण्यात येणारे अभ्यासक्रम असून, यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञानात कुशल मनुष्यबळ तयार होईल.’’
राज्य सरकार सौर ऊर्जा व पर्यावरणीय तंत्रज्ञानावर भर देत आहे. त्यामुळे संबंधित कौशल्य असणाऱ्या टेक्निशियनची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या उपक्रमांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच, ज्या संस्थांकडून नवीन अभ्यासक्रमांची मागणी केली जाईल त्यांच्याकडील प्रस्तावांवर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील प्रशिक्षणार्थ्यांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी चेंबूर येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या आयटीआयमध्ये रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रिशियन, वायरमन, आयओटी टेक्निशियन (स्मार्ट सिटी), इलेक्ट्रिक मेकॅनिक असे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील आयटीआय संस्थांचा दर्जा वाढवून त्यांना एक ‘हाय क्वालिटी ब्रँड’ बनवण्याचे काम सुरू आहे. खाजगी उद्योगांच्या सहकार्याने प्रशिक्षण सुविधा वाढवण्यात येत असून, युवा पिढीला रोजगारक्षम बनवण्यासाठी तंत्रप्रदर्शन, मार्गदर्शन शिबिरे यामार्फत प्रयत्न सुरू आहेत.