फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रथम, आयोगाने २०२३ साली झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षेच्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर ही यादी तयार करण्यात आली आहे.
सदर गुणवत्ता यादी ही तात्पुरती आहे. अंतिम निकाल प्रसिद्ध होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार असून, त्यानुसार गुणवत्ताक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, काही उमेदवार अपात्र ठरू शकतात. या यादीबाबतचा अंतिम निर्णय विविध न्यायालयीन प्रकरणांवरील निकालांवर अवलंबून राहील. त्यामुळे उमेदवारांनी त्यांचा पद पसंतीक्रम दिनांक १० ते १६ मे २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोगाच्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. आयोगाने अधिसूचित केलेल्या सात संवर्गांपैकीच पसंतीक्रम निवडावा लागेल. जर उमेदवाराने ‘No Preference’ हा पर्याय निवडला किंवा काहीही पसंतीक्रम सादर केला नाही, तर त्याच्या शिफारशीवर विचार केला जाणार नाही. एकदा सादर केलेला पसंतीक्रम निश्चित मानला जाणार आहे व नंतर तो बदलता येणार नाही.
दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे १८ मे २०२५ रोजी होणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी आयोगाने उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रसिद्ध केली आहेत. उमेदवारांना ही प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यात लॉगिन करून डाउनलोड करता येतील.
परीक्षेबाबतची सर्व माहिती व मार्गदर्शक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. उमेदवारांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा उल्लंघन केल्यास आयोग कारवाई करू शकतो. प्रवेशपत्र डाउनलोड करताना अडचण आल्यास उमेदवारांनी contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, तसेच ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या हेल्पलाईनवरही मदत मिळवू शकता.