फोटो सौजन्य - Social Media
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (RTE) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पालकांना १८ मार्चपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी नोंदणीची अंतिम तारीख १० मार्च निश्चित करण्यात आली होती. मात्र अनेक पालकांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. तसेच घरापासून एक किलोमीटर अंतराच्या शाळेचा नियम पालकांसाठी जाचक ठरत असल्याची तक्रार करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नोंदणीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळते. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी जिल्ह्यात १७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत एकूण १२ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
दरम्यान, यावर्षी आरटीई प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या काही नियमांमुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विशेषतः घरापासून एक किलोमीटर अंतराच्या शाळेचा नियम अनेकांसाठी अडथळा ठरत होता. या नियमामुळे काही पालकांना ऑनलाइन अर्ज करता आले नाहीत. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एक किलोमीटर अंतराचा नियम रद्दबातल ठरविला. विशेष म्हणजे नोंदणीची मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच हा निकाल लागला. त्यामुळे पालकांना अर्ज करण्यासाठी अधिक वेळ देणे आवश्यक असल्याने शालेय शिक्षण विभागाने नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार पालकांना पुन्हा नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आधी केलेल्या अर्जामध्येच आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करता येणार आहेत. त्यामुळे ज्या पालकांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांनाही अर्ज अद्ययावत करण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे अजूनही अर्ज न केलेल्या पालकांनी १८ मार्चपूर्वी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.






