संग्रहित फोटो
माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कारखान्याच्या सभासद, कामगार व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत स्वतः अजित पवार यांनी ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढवून कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान कारखान्याच्या संचालक मंडळाने अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावी, असा आग्रह धरला होता. त्यानुसार त्यांची स्वीकृत संचालक म्हणून नुकतीच निवड करण्यात आली होती.
बुधवार (दि.१२) रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर इतर कोणताही अर्ज न आल्याने प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवड जाहीर होताच संचालक मंडळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्ष संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “कारखान्याच्या सभासद, संचालक व कामगारांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, तो मी नक्कीच सार्थ ठरवेन. दिवंगत अजितदादांनी माळेगाव कारखान्याला नवे बळ दिले. त्यांचा विश्वास आणि परंपरा कायम ठेवत सर्व सभासद, कामगार, अधिकारी व संचालक यांना सोबत घेऊन कारखान्याची प्रगती साधण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच राज्यातील साखर कारखान्यांमध्ये सभासदांना सर्वाधिक ऊसदर देण्याचा ध्यास घेऊन कारखाना ‘नंबर वन’ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीमुळे माळेगाव कारखान्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सभासद व संचालक मंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : चाकणमध्ये भारत गॅस एजन्सीमोर गोंधळ; सिलिंडरचे दर वाढल्यामुळे नागरिक संतापले
अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिला
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संगीता कोकरे या कार्यरत आहेत. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून दोन महिला कार्यरत आहेत. राज्यातील सहकारी संस्थांमधील एकाच वेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी महिला असणारी ही एकमेव माळेगाव कारखाना ही सहकारी संस्था ठरली आहे.






