फोटो सौजन्य - Social Media
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबईतर्फे महाराष्ट्रातील संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अभिरूप मुलाखतींचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा UPSC परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे SIAC संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले. या अभिरूप मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या अंतिम मुलाखतीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळाली. तसेच तज्ञ मार्गदर्शकांच्या सल्ल्यामध्ये आपल्या तयारीतील उणिवा दूर करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
या अभिरूप मुलाखतींसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर पॅनल सदस्य म्हणून उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील, लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मुख्य आयकर आयुक्त जयंत जव्हेरी, झोनल विकास आयुक्त ज्ञानेश्वर पाटील, अणुविभागाचे संचालक नितीन जावळे, आयकर विभागातील अक्षय पाटील, माजी आयआरएस आणि आयपीएस अधिकारी विकास अहलावत, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवेमधील रुजुता बनकर तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. भूषण देशमुख यांचा समावेश होता.
या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना तज्ञांच्या प्रश्नांना उत्तर देताना आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच विविध घटकांवर अधिक सखोल माहिती देण्याची संधी मिळाली. तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आवश्यक असलेली वाणीतील स्पष्टता, शरीरभाषा, धोरणात्मक उत्तर देण्याची कला याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ 22 विद्यार्थ्यांनी घेतला असून सर्व विद्यार्थी UPSCच्या अंतिम मुलाखतीसाठी सज्ज होत आहेत. या मुलाखतींमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या विचारांची मांडणी, आत्मविश्वास आणि तणाव व्यवस्थापन याबाबतीत अधिक आत्मभान मिळाले आहे. संस्थेच्या संचालक डॉ. पाटोळे यांनी सांगितले की, या अभिरूप मुलाखतींचा पुढील टप्पा ऑनलाईन स्वरूपात होणार असून त्यात अधिक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळाले असून त्यांच्या तांत्रिक तसेच मानसिक तयारीला चालना मिळाली आहे.
SIAC संस्थेच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे संघ लोकसेवा आयोग परीक्षेमधील यशाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठीच नव्हे, तर प्रशासकीय क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठीही आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थी देशसेवेसाठी एक जबाबदार आणि कुशल प्रशासक म्हणून घडण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करू शकतील.