फोटो सौजन्य - Social Media
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील पवन कुमार प्रजापत यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. बालपणापासून आर्थिक अडचणींनी ग्रस्त असलेला पवन आज RAS (राजस्थान अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) अधिकारी झाला आहे. घराघरांतून भाजी विकणारा हा मुलगा आज लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
पवन कुमार यांचे शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेत 5वीपर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन वयाच्या लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. दहावीपर्यंत शिक्षण घेताना ते गावात घराघरात जाऊन भाजी विकायचे. याच पैशांवर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जगणं चालायचं. शिक्षण आणि उदरनिर्वाह यांचा संघर्ष पवन यांनी जवळून अनुभवलाय.
दहावीनंतर जोधपूरमध्ये ते दररोज फक्त ₹50 रोजंदारीवर मजुरी करत होते. त्याच वेळी त्यांनी प्रायव्हेट BA चे शिक्षणही सुरू ठेवले. 2012 साली भारतीय सैन्यात चपराशाची नोकरी मिळाली होती, पण त्यांनी ती न स्वीकारता शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर भर दिला. 2013 मध्ये रेल्वेमध्ये गनमॅन आणि 2014 मध्ये पटवारी म्हणून निवड झाली, मात्र त्यांचे स्वप्न काही वेगळंच होतं, RAS अधिकारी होण्याचं.
2016 मध्ये LRO (Legal Research Officer) पदासाठी त्यांची निवड झाली, परंतु त्यांनी आपली RAS अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा सोडली नाही. 2018 मध्ये त्यांनी पहिल्यांदा RAS परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केला, मात्र यश मिळालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा अभ्यास सुरू ठेवत 2021 मध्ये घेतलेल्या RAS परीक्षेत त्यांना 170वी रँक मिळाली आणि अखेर त्यांचं स्वप्न साकार झालं.
पवन कुमार प्रजापत यांचा प्रवास हा फक्त स्पर्धा परीक्षा पास होण्याचा नाही, तर अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही जिद्दीने लढण्याचा आहे. त्यांनी सिद्ध केलं की गरिबी, अडचणी आणि अपयश ह्यांना मात दिल्यास यश नक्कीच मिळू शकतं. आज ते केवळ एक अधिकारी नाही, तर लाखो गरजू, मेहनती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत.