फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी वाशिम जिल्ह्यात प्रशासन सज्ज झाले असून, परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५६ तर बारावीच्या परीक्षेसाठी २२ हजार ३६९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, एकूण ४२ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मंडळाच्या निर्देशानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने परीक्षेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू केले आहे. परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था, सुरक्षा, वीजपुरवठा तसेच आवश्यक भौतिक सुविधा यांची तपासणी केली जात असून, कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षार्थींवर करडी नजर ठेवली जाणार असून, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही महत्त्वाची उपाययोजना ठरणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८८ केंद्रांवरील ८३५ वर्गखोल्यांमध्ये, तर बारावीच्या परीक्षेसाठी ७४ केंद्रांवरील ८३० वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे, वाशिम जिल्ह्यात दहावीची १९ आणि बारावीची २८ अशी एकूण ४७ उपद्रवी परीक्षा केंद्रे असून, या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी अतिरिक्त दक्षता, कडक तपासणी आणि विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य मंडळाच्या वतीने ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येत असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षा काळात अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर जनरेटर किंवा इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच वर्गखोल्यांमध्ये पंखे, दिवे, फर्निचर यांसह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही, याचीही तपासणी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश आहाळे यांनी दिली. एकूणच, यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात दिसून येत आहे.






