दिल्ली अधीनस्थ सेवा चयन बोर्ड (DSSSB) कडून प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५,३४६ रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी dsssb.delhi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
नैनीतालमध्ये शिक्षण अन् दिल्ली विद्यापीठातून BSc, अमिताभ बच्चन यांचे ‘या’ क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न अपूर्णच
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही शैक्षणिक व वयोमर्यादेचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात किमान ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. बी.एड. (B.Ed.) किंवा समकक्ष शिक्षक प्रशिक्षण पात्रता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे दरम्यान असावी, मात्र सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. मात्र, महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwD) आणि माजी सैनिक (Ex-Servicemen) यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या भरतीत दिल्ली सरकारच्या विविध शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती होईल. त्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना वाचून सर्व तपशीलांची खात्री करावी.