फोटो सौजन्य - Social Media
दहावीची बोर्ड परीक्षा हा टप्पा विद्यार्थी आणि पालकांसाठी नेहमीच तणावा१० गुणांचे पर्यायी प्रश्नचा मानला जातो. मात्र, शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांत केलेल्या बदलांमुळे आता दहावी उत्तीर्ण होणे तुलनेने सोपे आणि दिलासादायक झाले आहे. नवीन पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी झाला असून निकालाच्या टक्केवारीतही सुधारणा होताना दिसत आहे.
यावर्षी बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत असून प्रॅक्टिकल परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. तर दहावीच्या बोर्ड परीक्षा २० मार्चपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दहावीचा नवा परीक्षा पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. दहावीमध्ये सध्या ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ ही पद्धत लागू आहे. सहा विषयांची परीक्षा घेतली जात असली तरी अंतिम निकाल हा सर्वोत्तम पाच विषयांच्या गुणांवर आधारित असतो. सर्वांत कमी गुण मिळालेला विषय निकालातून वगळला जातो. त्यामुळे एखाद्या विषयात कमी गुण पडले तरी विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होत नाही. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना मोठा मानसिक दिलासा मिळत आहे.
यासोबतच त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आले आहे. यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी/संस्कृत किंवा इतर भारतीय भाषा असे तीन भाषा विषय अनिवार्य आहेत. प्रत्येक विषय १०० गुणांचा असून त्यापैकी २० गुण प्रॅक्टिकल किंवा तोंडी परीक्षेसाठी राखीव असतात. हे २० गुण शाळा स्तरावर दिले जातात. बहुतांश विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये १८ ते २० गुण मिळत असल्याने लेखी परीक्षेतील ताण कमी होतो. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकलमध्ये १८ गुण मिळाले आणि लेखी परीक्षेत १७ गुण मिळाले, तरी एकूण ३५ गुण पूर्ण होत असल्याने तो विद्यार्थी त्या विषयात उत्तीर्ण ठरतो. हाच पॅटर्न सामाजिक शास्त्र, गणित आणि विज्ञान या विषयांनाही लागू आहे. त्यामुळे अवघड विषयांमध्येही उत्तीर्ण होणे तुलनेने सोपे झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये १० गुणांचे पर्यायी प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर देताना अधिक पर्याय उपलब्ध होतात. एखादा प्रश्न नीट समजला नाही किंवा अवघड वाटला, तर पर्यायी प्रश्न निवडण्याची मुभा मिळते. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे. एका विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३५ टक्के गुण आवश्यक आहेत. प्रॅक्टिकलचे गुण आणि पर्यायी प्रश्नांचा लाभ यामुळे ही टक्केवारी गाठणे विद्यार्थ्यांसाठी सोपे होत आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, हा पॅटर्न विद्यार्थ्यांमध्ये भीती कमी करून संकल्पनात्मक समज वाढवण्यास मदत करतो. एकूणच दहावीचा नवा परीक्षा पॅटर्न विद्यार्थीकेंद्री असून ताणमुक्त शिक्षणाकडे नेणारा आहे. त्यामुळे दहावीच्या निकालात सातत्याने सुधारणा होत असून, विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.






