'या' परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप (Photo Credit- X)
काही महिलांना आपले दागिने सोबत आलेल्या नातेवाईकांकडे सोपवावे लागले, तर ज्यांच्यासोबत कोणीही नव्हते त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, कडक तपासणीच्या नावाखाली महिलांच्या भावनांचा विचार न केल्याने प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सक्तीमुळे परीक्षा केंद्राबाहेर तणावाचे आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महिला परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या नावाखाली होणारी ही अडवणूक चुकीची असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यभरात रविवारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीची परीक्षा पार पडली. या परीक्षेला जाताना परीक्षार्थीना वेगळीच परीक्षा द्यावी लागली. परीक्षा केंद्रात आत जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावे लागले आहे. रविवारी सकाळी ९:३० ते १२ यावेळेत परीक्षा झाली. तत्पूर्वी सकाळी सात वाजता रिपोर्टिंग टाईम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती. यात कुठलेही मेटलच साहित्य सोबत घेऊन जाऊ नका, असे गेटवरच सांगण्यात आले.
मंगळसूत्र, काना नाकातले दागिने काढण्याच्या सूचना केल्या. त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरची सगळी दागिने काढावे लागले. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रा जाताना अडचण झाली. काहींच्या सोबत नातेवाईक होते त्यांनी नातेवाईकांना सोने दिले. मंगळसूत्र दिले, पण काहींची मोठी अडचण झाली. यासंदर्भात मागच्या 66 काळातही तक्रारी आल्या होत्या.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, यासंदर्भात मी माहिती घेईन. मागच्या वेळी असा विषय झाला होता तेव्हा परीक्षेचे आयोजन करणाऱ्यांनी सांगितले होते की असे अनुभव आले की वेगवगेळ्या गोष्टीमध्ये साहित्य लपवले जाते. त्यातून चिटींग केली जाते. तथापि अशा पद्धतीने मंगळसूत्र काढून घेणे योग्य नाही. परंतु याची आधी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल.
शिक्षक पात्रता परिक्षेसाठी गेलेल्या महिला उमेदवारांच्या गळ्यातील मंगळसूत्रासहित सर्व दागिने काढून ठेवण्यास सांगण्यात आले, यावरून अंबादास दानवे म्हणाले, विचित्र विरोधाभास ! ‘हिंदुत्व’ आणि ‘संस्कृती’च्या गप्पा मारणा-यांच्या राज्यात महिलाना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय. ११ वर्षाच्या सतेनंतरही प्रशासनाला ‘मंगळसूत्र’ आणि ‘कॉपी’ मधला फरक कळत नाही बहुदा. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरु आहे, पाकिस्तानात नाही. असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.






