फोटो सौजन्य - Social Media
हा अभ्यासक्रम मंदिर आणि धार्मिक संस्थांमध्ये आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे सखोल व व्यावहारिक ज्ञान देणारा आहे. उद्घाटन समारंभास शिक्षण, कायदा, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी सर्व वक्त्यांनी एकमताने सांगितले की, आज मंदिरांचे व्यवस्थापन केवळ पूजा-पाठ आणि धार्मिक विधींपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यात प्रामाणिकपणा, आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.
या अभ्यासक्रमात केवळ सैद्धांतिक शिक्षणावर भर न देता, प्रत्यक्ष अनुभव, केस स्टडीज आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येते. सेवा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ट्रस्ट प्रशासन, अध्यात्मिक अर्थव्यवस्था, भक्त व्यवस्थापन तसेच समाजाशी दृढ नाते निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मंदिरांच्या दैनंदिन कामकाजासोबतच दीर्घकालीन व्यवस्थापनाची समज विकसित करता येते.
नवीन बॅचचे स्वागत करताना शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मॅनेजिंग कौन्सिल अॅड. एस. के. जैन यांनी सांगितले की, “आज ट्रस्ट आणि मंदिरांचे जबाबदार व्यवस्थापन अत्यंत आवश्यक झाले आहे. मंदिर व्यवस्थापन करताना भक्त, पुजारी, ट्रस्टी, शासन आणि समाज या सर्व घटकांचा समतोल साधावा लागतो. हा अभ्यासक्रम पारदर्शक प्रशासन, मंदिर मालमत्तेची सुरक्षा, निधी व्यवस्थापन आणि भाविकांच्या गर्दीचे नियोजन याबाबत योग्य दिशा देतो.”
वीस्कूलचे ग्रुप डायरेक्टर प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हा कार्यक्रम “राष्ट्रनिर्मितीसाठी मंदिर व्यवस्थापन” या व्यापक विचारावर आधारित आहे. मंदिर ही केवळ श्रद्धेची ठिकाणे नसून, ती समाज, संस्कृती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचीही महत्त्वाची केंद्रे आहेत. भारतीय मूल्ये आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा समन्वय साधत ‘विकसित भारत 2047’ साठी सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्व घडवणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
टेंपल मॅनेजमेंट प्रोग्रामच्या बॅच 2 च्या सुरुवातीसह, वीस्कूलने प्रामाणिक, मूल्याधिष्ठित आणि समाजाभिमुख नेतृत्व घडवण्याच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल टाकले आहे. भविष्यात हे प्रशिक्षित विद्यार्थी मंदिर व धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करतील आणि मंदिरांना आस्था, सेवा, शिस्त व राष्ट्रनिर्मितीची मजबूत केंद्रे बनवण्यात मोलाची भूमिका बजावतील.






