
आंबेवाडी गावातील (धाराशिव जिल्हा) मुले आणि नागरिक बालविवाहाविरोधात शपथ घेताना (फोटो सौजन्य - श्रुति गणपत्ये)
बालविवाह, लिंगाआधारित भेदभाव, मुलींना शिक्षणाच्या संधी नसणे, महिलांवरील अत्याचार अशा अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी आणि गावकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी हा उत्सव केला जातो. सतत तीन वर्षांची जनजागृती, विद्यार्थी, शिक्षक यांचे कष्ट, महिला आणि गावातल्या प्रमुख व्यक्तींचा पाठिंबा यामुळे आंबेवाडीत गेल्या दोन वर्षांत एकही बालविवाह झालेला नाही. आंबेवाडी हे लहानसे गाव आता धाराशिव जिल्ह्यातलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं.
उत्सव समतेचासाठी सहभागी मुलांनी “मुलींना वाचवा, त्यांना शिक्षण द्या”, “मुली आणि मुलगे दोघेही कुटुंबाचे एकसमान वारस” आणि “बालमजुरी संपवा, सर्व मुलांना शाळेत आणा” अशी हाताने रंगवलेले फलक घेतले होते. गावातल्या प्रत्येक घरात जाऊन मुले सर्वांना देवळासमोरील मोकळ्या जागेमध्ये येण्याचे आवाहन करत होते. वाटेत चालताना नृत्य, गाणी, घोषणा, टाळ्या, जयघोष हे सुरूच होतं. “सर्व गावकऱ्यांनी बालविवाहाविरोधात शपथ घेण्यासाठी मंदिरात जमा व्हावे!” अशी घोषणा ऐकताच पुरुष, महिला, वृद्ध आजोबा-आजीसुद्धा, आपली कामे बाजूला ठेवून देवळाकडे जमू लागली.
बालविवाह मोठी समस्या
मराठवाड्यामध्ये बालविवाह ही मोठी समस्या आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ (२०१९–२१) नुसार, महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांत, मराठवाड्यासह, बालविवाहाचे प्रमाण २२% पेक्षा जास्त आहे. परंपरा आणि गरिबीत रुजलेली ही प्रथा अनेकदा मुलींना ८वी नंतर शाळा सोडण्यास भाग पाडते. त्यांचे लवकर लग्नं झाल्याने लवकर गर्भारपण, कुपोषण, आरोग्याचे धोके, बालमजुरी हे ओघानं त्यांच्या वाट्याला येतं आणि पिढ्यानपिढ्यांच्या ही कुटुंबं गरिबीच्या चक्रात अडकतात.
युनिसेफतर्फे प्रयत्न
हे चक्र तोडण्यासाठी, महाराष्ट्रातील धाराशीवमध्ये, अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता.
देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला.
आंबेवाडी बदल
या उपक्रमाअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून, आंबेवाडीमध्ये अनेक बदल दिसून आले. आधी केवळ मुले आणि शिक्षक यांचाच सहभाग असलेला हा उत्सव समतेचा आता संपूर्ण गावाचा झाला आहे. शाळेतील मुले, पालक, वडीलधारी मंडळी आणि ग्रामपंचायत सदस्य आता दरवर्षी समतेच्या उत्सवासाठी एकत्र येतात. यावर्षी मुलींनी, जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई आणि सावित्रीबाई फुले या धाडसी महिलांच्या वेशभूषा केल्या तर मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या वेशात संदेश देण्याचा प्रयत्न केला.
मंदिराच्या अंगणात, सर्व गावकऱ्यांनी बालविवाह रोखण्याची आणि सर्व मुलींना शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या स्वप्नांना पाठबळ मिळावे यासाठी शपथ घेतली. याचा परिणाम जाणवण्यासारखा होता. “मी स्वतः लहान वयात लग्न केले होते,” एक ज्येष्ठ महिला यावेळी म्हणाल्या, “पण मी कधीही माझ्या नातीला त्याच अनुभवातून जाऊ देणार नाही.”
मुलांचा उत्साहाने सहभाग
ही सर्व मंडळी मग शाळेमध्ये पोहोचली. तिथे मीना राजू मंचच्या माध्यमातून काही उपक्रम सुरू करण्यात आले होते. त्यात मुलांचा उत्साहपूर्ण सहभाग होता. वादविवाद, निबंध स्पर्धा, नाटक आणि भूमिका-बदल आदी खेळांद्वारे, स्त्री-पुरुष समान असतात आणि महिलांना समान संधीची गरज असते हा संदेश ठळकपणे देण्यात आला. “आज, मुलगे स्वयंपाक करतात आणि साफसफाई करतात. मुली फुटबॉल खेळतात आणि सार्वजनिकरित्या बोलतात,” इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी समिक्षा म्हणाली. “कोणीही मला बाहेर जाण्यापासून थांबवत नाही. माझे कुटुंब माझ्या स्वप्नाला पाठबळ देते. मला डॉक्टर बनायचे आहे,” तिने इच्छा व्यक्त केली.
तिचे शिक्षका, दशरथ बोंदर यांनी सुरुवातीपासून मीना राजू मंचच्या उपक्रमाला पाठिंबा दिला होता. ते कायम मुलांना समान संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असतात. “एकेकाळी इथे बालविवाह सामान्य होता. मुलींची सुरक्षितता ही सततची चिंता होती. पण उत्सव समतेचा सुरू झाल्यापासून, मीना राजू मंचच्या उपक्रमांमुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. आंबेवाडीत गेल्या दोन वर्षांत एकही बालविवाह झालेला नाही. पुरुष आणि महिला एकत्र उभे राहतात तेव्हाच खरा बदल तेव्हा होतो. आमच्या मुलांनी सततच्या प्रयत्नांनी हे आम्हाला दाखवून दिले,” बोंदर म्हणाले.
बालविवाहाचा निषेध
त्या दिवसाचा समारोप बालविवाहाचा निषेध करणाऱ्या नाटकाने झाला. मुलांनीच लिहिलेल्या आणि सादर केलेल्या या नाटकाला गावकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. काही विर्द्यार्थ्यांनी भाषणं करून लिंग समभावाविषयी आपले मत मांडले. युवकांसाठी छोटे चित्रपट दाखवण्यात आले. उपस्थित सर्व प्रौढांनाही या संवादामध्ये सामील करून घेण्यात आले होते. स्थानिक मान्यवरांनी मुलांचे केवळ सहभागी म्हणून नव्हे, तर भावी नेतृत्व म्हणून कौतुक केले. या सततच्या सामूहिक प्रयत्नांमुळे, आंबेवाडीमध्ये आता समता केवळ साजरी केली जात नाही ती रोजच्या जगण्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.
संकलन: धनश्री देशमुख, कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर
छायाचित्र श्रेय: श्रुति गणपत्ये