कोरो संस्थेचे कार्यकर्ते निखिल सर्वगोड आणि स्वाती खुणे, धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावातील मुलांशी लिंग समभाव कार्यक्रमावर संवाद साधताना आणि त्यांची मने जिंकताना.
हे नाते एका रात्रीत तयार झालेलं नक्कीच नव्हतं. स्वाती आणि निखिल मीना-राजू मंचाचे कार्यकर्ते म्हणून त्या आणि इतर अनेक शाळांमध्ये तीन-चार वर्ष सातत्याने जात होते, मुलांशी संवाद साधत होते. मुले त्यांना “बाहेरचे” म्हणून नव्हे तर आपल्यातील मित्र म्हणून मानत होते. याला कारण म्हणजे त्या दोघांनी केवळ लिंग समभाव शिकवला नाही तर स्वतःच्याही आयुष्यामध्ये लागू केला. लिंग समभाव या विषयाची सुरुवात स्वाती आणि निखिलसाठी धाराशिव जिल्हात २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमाने झाली.
धाराशिव जिल्ह्यात २०२२ पासून अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव (जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोग्रॅम) किशोरवयीन मुले, शिक्षक आणि समुदायांसाठी राबवण्यात आला. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला. या कार्यक्रमातून खेळाधारित शिक्षणातून लिंगभेदाच्या रूढींना आव्हान देण्यासाठी सक्षम केले. मीना राजू मंच जो इयत्ता ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं.
स्वातीसाठी कोरो या स्वयंसेवी संस्थेमध्ये सामील होणे म्हणजे पाच वर्षांच्या मौनाला धुडकावून लावणे होते. मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न आणि मातृत्वाने तिचे आयुष्य व्यापले. तरी काम करण्याची ओढ कधी मावळली नाही. आई-वडिलांच्या पाठिंब्याने, पण सासरच्यांच्या मर्जीविरुद्ध, तिने डेटा एंट्रीचे काम मिळवले. पण कोरोकडून लिंग समभाव प्रकल्पाची संधी आल्यावर तिने लगेच स्वीकारली. यात प्रथमच ती फील्डवर्कसाठी एकटी घराबाहेर पडली. तिच्या कुटुंबाला हे मान्यं नव्हते. पण तिने गावोगावी शाळांमध्ये जाऊन लिंग समानता या विषयावर बोलण्याचा निर्णय घेतला आणि तिचं जग बदलून गेलं.
निखिलसाठी हा प्रकल्प कोविडच्या काळात आधार म्हणून आला. त्याचा केटरिंग व्यवसाय फारसा चालत नव्हता, कार्यक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या हॉलचं काम फार नव्हतं. अशावेळी त्यानेही नवीन काहीतरी करायचं म्हणून लिंग समभाव प्रकल्पावर काम करण्याची जबाबदारी स्वीकारली. “मला ‘लिंग समभावभाव’ किंवा ‘भेदभाव’ असे शब्दही माहीत नव्हते. स्वाती माझी जुनी मैत्रिण आहे. तिने सांगितलं म्हणून मी इथे आलो,” निखिल सर्वगोड म्हणाला.
त्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाने त्यांचे आयुष्य बदलून गेले आणि लिंग समभावावर ते दोघेही आपल्यापरिने विचार करू लागले. स्वातीला पहिल्यांदाच महिलांच्या हक्कांची जाणीव झाली. निखिलला भेदभावाची जाणीव झाली. तो हॉस्टेलमध्ये असताना स्वतःचे कपडे धुवायचा. पण घरी कपडे धुतले तर आईला ते मान्य नव्हतं. का तर तो मुलगा आहे आणि कपडे धुणं हे काम बायकांचं असतं ही समजूत. पण प्रशिक्षणानंतर तो घरी परत आला आणि स्वतःचे कपडे धुवायला लागला. त्याच्या आईला अगदी रडूच कोसळलं की मुलगा असं का करतोय. “आईने मला कपडे धुण्यास मनाई केली. कारण हे काम माझं नाही. मग तिच्यापासूनच मी लिंग समभावाची सुरुवात केली. कामाला लिंग नसतं हे तिला समजावून सांगावं लागलं. हळूहळू तिने ते मान्य केलं,” निखिल हसत म्हणाला.
स्वातीची लढाई मात्र अधिक कठीण होती. लिंग समभाव विषयावर तिची आणि नवऱ्याची रात्री उशिरापर्यंत चर्चा चालायची, वादही व्हायचा. पण तिने संवाद सुरू ठेवला. “एकदा मी नवऱ्याला माझ्यासाठी पाण्याचा ग्लास आणायला सांगितला. त्यांना अपमान वाटला. पण माझ्या मुलाला मात्र अशी कामं करण्याची लाज वाटत नाही. तो बिनधास्त घरकामात मला मदत करतो. त्याचे मित्र त्याला चिडवतातही. पण तो मनावर घेत नाही. घरकामाला लिंग नसल्याचं मी माझ्या मुलाला पटवून देऊ शकले हाच माझा खरा विजय आहे,” स्वाती म्हणाली.
वैयक्तिक पातळीवर लिंग समभावाची सुरुवात झाली तरी दोघांनाही शाळांमध्ये प्रवेश करणे सोपं नव्हते. अपरिचित पुरुषांशी बोलताना स्वाती अडखळत होती. सगळ्या शाळा सहकार्य करत नव्हत्या, मुलांचा सहभाग नसायचा. ग्रामीण भागामध्ये बाईकवर एकत्र फिरणाऱ्या दोन अविवाहित कार्यकर्त्यांकडे संशयाच्या नजरा पडत होत्या. पण या सगळ्यावर मात करायला ते शिकले. संवाद साधायचा तर आधी समोरच्याचं ऐकून घ्यायला हवं. तेच त्यांनी केलं. मुलं, शिक्षक, गावातील प्रतिष्ठीत मंडळी यांना भेटून संवाद साधून त्यांचं ऐकून त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी मुलांच्या आयुष्यात एक स्थान निर्माण केलं. विशेषतः मुलींना खाजगी गोष्टी बोलण्यासाठी त्यांनी एक सुरक्षित वातावरण निर्माण केलं. मग मुलींकडूनच प्रश्न यायला लागले, “झाडू फक्त आम्हीच का मारायचा?” “झोपाळ्यावर मुलांची आधी संधी मिळते?”, “स्वयंपाकात मुलं का मदत करत नाहीत”. शिक्षकांनी हा बदल ओळखला जेव्हा विद्यार्थी स्वच्छ शौचालये, खेळ साहित्य आणि आदराची वागणूक मागू लागले. ही तक्रार नव्हती तर त्यांच्या हक्काची जाणीव होती. निखिल आणि स्वातीच्या लिंग समभावाच्या सत्रांमध्ये शिक्षकही बसून नोट्स घेऊ लागले. “मुलांना जाणवले की आपण त्यांच्या आयुष्याबद्दल बोलतोय, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडेचे. विशेषतः मुलींना. आता आमचं नातं एवढं घट्ट आहे की, आम्हाला उशीर झाला की मुलं शिक्षकांना फोन करायला सांगतात. त्यांना आमच्याशी गप्पा मारायच्या असतात,” निखिल म्हणाला.
काम करताना स्वाती आणि निखिलला लवकर समजले की शाळा स्वतंत्रपणे अस्तित्वात नाहीत. ही मुलं शाळेतून शिकून घरी गेली, गावात गेली की तिथे वातावरण पुन्हा तेच रूढीवादी असतं. घरकाम करणाऱ्या मुलाची गावात थट्टा होते, मुली आपले विचार सर्व ठिकाणी ठामपणे मांडू शकत नाहीत. मग त्यांनी ग्रामपंचायत, महिला सभा, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्राम सेवक अशा सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. “मुले एकट्याने परिवर्तन घडवू शकत नाहीत. आम्ही अशी परिसंस्था उभारण्याचा प्रयत्न करतो जिथे शाळेतील मूल्यव्यवस्था समाजही मान्य करून मुलांना त्यांचे हक्क देईल आणि त्यांच्या वाढीसाठी सुरक्षित वातावरणही. लिंग समभाव हा केवळ मुलांपुरता मर्यादीत न राहता समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भेदभाव कमी होऊ शकेल,” स्वाती म्हणाली.
लिंग समभाव कार्यक्रमाच्या तीन वर्षांनंतर स्वाती आणि निखिल यांची मैत्री स्वतःच समभावाचा आदर्श मांडते. एक स्त्री आणि पुरुष समान भागीदार म्हणून, एकाच ध्येयाने वाटचाल करू शकतात हे त्यांच्या मैत्रीने आणि कामाने दाखवून दिले.
संकलन: श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र






