धक्कादायक ! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच जळगावच्या एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
तेजस गजानन महाजन (वय १३) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तेजसने सोमवारी सायंकाळी बाजारात फिरताना एका दुकानातून बिर्याणी घेतली होती. मात्र, त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून तो कुणालाच दिसला नाही. बेपत्ता झाल्यानंतर गावात शोधमोहीम सुरू झाली. जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला. परंतु, त्याचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर, एका व्यक्तीला तेजसचा मृतदेह आढळून आला. त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासह रिंगणगाव येथे राहत होता. तो 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र, कुठेही काही माहिती मिळाली नाही. नंतर त्याचा मृतदेहच मिळून आला. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातही घडली हत्येची घटना
पुण्याच्या देहूरोड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या मुलाचा चुलत भाऊ देखील या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे आहे. तर सनी सिंग (वय- 19, रा. गंभीरपूर, जि. गोपालगंज, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.