सौजन्य - सोशल मिडीया
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कासना येथील निक्कीची निर्घृण हत्या करण्यात आली. पती आणि सासरच्या कुटुंबातील लोकांवर या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. निक्कीचे कुटुंब तिचा पती विपिन आणि सासरच्या लोकांना फाशी देण्याची मागणी करत आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. आता या खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
कसना येथील सिरसा गावात २६ वर्षीय निक्की भाटी हिला जाळून मारण्यात आले. निक्कीची मोठी बहीणही त्याच कुटुंबात विवाहित आहे. तिने संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते आणि असा आरोप करण्यात आला होता की २१ ऑगस्ट रोजी निक्की भाटी हिला तिचा पती विपिन आणि सासू दयावती यांनी जाळून मारले. आता निकीच्या आरोपी पतीचे सीसीटीव्ही फुटेज त्याच्या घराजवळील एका दुकानातून सापडले आहे.
निकीच्या कुटुंबानी असा आरोप लावला की, तिचा पती विपिनने तिला जाणूनबुजून जिवंत जाळले. निक्की आणि विपिनचे 2016 साली लग्न झाले होते, त्यानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी तिचा सतत छळ केला जात होता. सासरच्यांनी प्रथम स्कॉर्पिओ कार आणि नंतर बुलेटची मागणी केली, जी निकीच्या कुटुंबानेही पूर्ण केली. मात्र त्यानंतर आरोपीच्या कुटुंबाचा लोभ आणखी वाढल्याचा आरोप आहे. त्यांनी निकीच्या कुटुंबाकडून थोडेथोडके नव्हे 36 लाख रुपयांची मागणी केली. मात्र हे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर निक्कीचा पती तिचा छळ करू लागला आणि त्याने तिचा जीव घेण्याचा भयानक कट रचला.
सीसीटीव्हीमध्ये काय दाखवले?
हा सीसीटीव्ही फुटेज घटनेच्या वेळेचा असल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक लोक त्यात दिसणाऱ्या व्यक्तीला विपिन म्हणून ओळखत आहेत. तो व्यक्ती एका कारच्या मागे उभा आहे. तो अचानक पळतो आणि नंतर पटकन मागे येतो. काही क्षणांनंतर, एक वृद्ध पुरूष आणि एक शेजारी घराकडे धावताना दिसतात. फुटेजमधील महिला देखील स्पष्टपणे घाबरलेल्या दिसतात. पोलिसांनी हे फुटेज त्यांच्या तपासाचा भाग बनवले आहे, परंतु त्याची सत्यता अजूनही संशयास्पद मानली जात आहे.
बहीण आणि मुलाने नोंदवला जबाब
निकीची बहीण कांचन हिच्या सांगण्यानुसार, तिचे आणि तिच्या बहिणीचे (निक्कीचे) लग्न एकाच कुटुंबात झालं होतं. कांचनने सांगितले की, तिच्या पतीने आणि सासरच्यांनी निकीच्या मानेवर आणि डोक्यावर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर तिच्यावर ॲसिडही टाकलं. आणि तिच्या मुलासमोरच निक्कीला आग लावली. हे सगळं घडत असताना कांचनने निक्कीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं कोणीच ऐकलं नाही, उलट तिलाही मारहाण करण्यात आलीय. याप्रकरणात मुलाने दिलेला जबाबही खूप धक्कादायक आहे.
सध्या पोलिसांचा दावा आहे की निक्कीला सिरसा येथील तिच्या घरात मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर काही ज्वलनशील पदार्थ ओतण्यात आले आणि तिला जाळून टाकण्यात आले. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेत असताना निक्कीचा मृत्यू झाला. यानंतर, निकीची मोठी बहीण कांचनने पोलिसात एफआयआर दाखल केली, ज्यामध्ये तिने तिच्या पती आणि सासूवर निकीला जाळून मारल्याचा आरोप केला आहे.